सीमा सुरक्षा वाढवण्यावर भर देणार

0
3

>> अमित शहा यांचे जोधपूरमध्ये प्रतिपादन

>> बीएसएफचा 60 वा स्थापना दिन कार्यक्रम

देशातील सर्व सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम राबविण्यात येणार आहे, तसेच, सीमा सुरक्षा वाढवण्यावर भारत सरकार काम करत असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. राजस्थानमधील जोधपूर येथे बीएसएफच्या 60 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात गृहमंत्री शहा बोलत होते.
गृहमंत्री शहा यांनी यावेळी भारत घेत असलेल्या सुरक्षात्मक भूमिकेबद्दलची माहिती दिली. भारत लवकरच आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी एक व्यापक अँटी-ड्रोन युनिट तयार करणार असल्याचे शहा म्हणाले. यामुळे पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन निष्क्रिय करणे आणि त्यांचा शोध घेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून येत्या काळात ड्रोनचा धोका अधिक गंभीर होणार आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात आम्ही देशासाठी सर्वसमावेशक अँटी ड्रोन युनिट तयार करणार असल्याचे शहा यांनी सांगितले. पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशांसह भारताच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सीमा व्यवस्थापन प्रणालीवर काम सुरू आहे. आसाममधील भारत बांगलादेशाच्या सीमेवरील धुबरी नदीकडे तैनात असलेल्या सीआयबीएमएसकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे. संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय सीमेवर एक व्यापक सीमा व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे, ती पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर लागू केली जाईल, अशी माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच मोदी सरकार व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामद्वारे उत्तर सीमावर्ती गावांमध्ये कनेक्टिव्हिटी, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधा सुधारत आहे, ज्यामुळे स्थलांतर थांबत असल्याचा दावा यावेळी शहा यांनी केला. याशिवाय, केंद्र सरकारने भारताच्या सीमेवर कुंपण, रस्ते आणि इतर गोष्टींसाठी मोठा अर्थसंकल्प मंजूर केला असल्याचे शहा यांनी सांगितले.