सर्वोच्च न्यायालयाने काल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी यांना जम्मू-काश्मीरातील त्यांचे सहकारी तथा माजी आमदार महंमद युसूफ तारिगामी यांना भेटण्यासाठी काश्मीरात जाण्याची परवानगी दिली. येच्युरी यांना काश्मीरात जाऊ दिल्यास तेथील स्थितीवर परिणाम होण्याची केंद्र सरकारने व्यक्त केल्यानंतरही न्यायालयाने येच्युरी यांना काश्मीरात जाण्यास परवानगी दिली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विचारले की जर एक नागरिक आपल्या मित्राच्या भेटीसाठी तेथे जाऊ इच्छित असेल तर तुमची काय अडचण आहे? या देशाचा एक नागरिक एखाद्या भागात जाऊ इच्छित असेल तर तो जाऊ शकतो असे गोगोई म्हणाले.येच्युरी यांना त्यांच्या सहकार्याला भेटण्यासाठीच परवानगी दिली आहे. त्यांनी अन्य काही उचापती केल्यास तो न्यायालयाच्या आदेशाचा भंग ठरेल असे न्यायालयाने बजावले आहे.