सीएए समर्थनार्थ आज भाजपची रॅली

0
218

भारतीय जनता पक्षातर्फे आज शुक्रवार ३ जानेवारी रोजी संध्याकाळी पणजी शहरात केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ भव्य रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर जे.पी. नड्डा पहिल्यांदाच गोव्यात येत आहेत. नड्डा यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. सीेएए समर्थनार्थ रॅलीला सुमारे २६ ते २७ हजार भाजपचे समर्थक उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी ३.३० वाजता ईडीसी पाटो येथून सीएए समर्थनार्थ रॅलीला प्रारंभ होणार आहे. या रॅलीचे आझाद मैदानावर भव्य सभेत रूपांतर केले जाणार आहे. या सभेत राष्ट्रीय कार्याध्यक्ष नड्डा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, असेही प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी सांगितले.

विदेशातही समर्थन रॅली
देशभरात सीएएला नागरिकांकडून भरघोस पाठिंबा मिळत आहे. विदेशात सुध्दा सीएएच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन केले जात आहे. तथापि, कॉंग्रेस व इतर काही पक्षांकडून सीएएला विरोध केला जात आहे. सीएएबाबत नागरिकांत निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी सीएए समर्थनार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यासाठी तारीख निश्‍चित झालेली नाही. येत्या आठ ते दहा दिवसात नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाऊ शकते. भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी कुठल्याही प्रकारची चुरस निर्माण झालेली नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमताने नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाणार आहे, असे तेंडुलकर यांनी सांगितले.

भाजपच्या संघटनात्मक निवडणुका ४० पैकी ३८ मतदारसंघात पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तसेच उत्तर व दक्षिण जिल्हा समित्यांच्या अध्यक्षांची निवड करण्यात आलेली आहे. बाणावली आणि वेळ्ळी या दोन मतदारसंघातील संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, दामू नाईक, गोविंद पर्वतकर यांची उपस्थिती होती.

ईडीएम महोत्सवावर भूमिका नाही
भाजपने राज्यात दोन ईडीएम संगीत महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत कुठल्याही प्रकारची भूमिका निश्‍चित केलेली नाही. पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत याविषयी धोरण निश्‍चित केले जाईल, असे तेंडुलकर यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.