सीएएविरोधात दिल्लीतही हिंसाचार

0
168

>> चार सरकारी बसगाड्या जाळल्या : खाजगी वाहनांचीही जाळपोळ

संसदेत नुकताच बहुमताने संमत झालेल्या सिटीझनशीप अमेंडमेंट ऍक्ट तथा नागरिकता दुरुस्ती कायद्याला (सीएए) ईशान्येकडील राज्यांमधून तीव्र विरोध होत असतानाच त्याचे लोण काल दिल्लीतही पसरले.

येथील जमिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काल या कायद्याविरोधात विद्यापीठ आवारात निदर्शने सुरू केली होती. याच दरम्यान विद्यापीठ संकुलाबाहेर संध्याकाळी शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लोकांनी तेथील दिल्ली परिवहनच्या चार बसगाड्यांना आग लावून जाळल्या तसेच काही खाजगी चारचाकी व दुचाकी वाहनेही जाळली.
हिंसाचारानंतर दाखल झालेल्या पोलिसांनी निदर्शकांना पांगविण्यासाठी अश्रूधूर व लाठीमारही केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान वरील कायद्याविरोधात जमिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली असली तरी मुख्य रस्त्यावरील वाहनांच्या जाळपोळीत या विद्यार्थ्यांचा सहभाग नाही असे निवेदन विद्यापीठ प्रशासनाने एका पत्रकाद्वारे जारी केले आहे. आपले विद्यार्थी विद्यापीठाच्या आवारातच होते असे या पत्रकात म्हटले आहे. जमिया स्टुडंटस् युनियननेही असेच निवेदन केले आहे.

दिल्लीतील जमियानगर येथे दिल्ली परिवहन महामंडळाच्या तीन बसगाड्या जाळपोळीत पूर्णपणे खाक झाल्या आहेत. तर त्याआधी दुपारी निदर्शने करणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वरील कायद्याविरोध निदर्शने करणार्‍यांनी कोणताही हिंसाचार करू नये असे आवाहन केले आहे. निदर्शकांनी शांततापूर्ण पध्दतीने आपला विरोध व्यक्त करावा असे त्यांनी म्हटले आहे.