सीईओतर्फे राजकीय पक्षांची बैठक

0
15

मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आयएएस) यांनी काल आल्तिनो येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांच्या सर्व प्रतिनिधींचे सहकार्य आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

सदर बैठक मुख्य निवडणूक अधिकारी श्री. कुणाल यांच्या अध्यक्षस्थेखाली संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त सीईओ नारायण सावंत, उपसीईओ संगीता नाईक आणि सहायक नोडल अधिकारी (निवडणूक खर्च) मनोहर कारेकर यावेळी उपस्थित होते.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेदरम्यानचे त्यांचे अनुभव सांगितले. आल्तिन गोम्स, खछउ यांनी या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकी दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या सहकार्याचे आणि मार्गदर्शनाचे कौतुक करताना सांगितले की, समस्यांकडे कुणालचा दृष्टिकोन उल्लेखनीय होता. श्री. कुणाल (आयएएस) यांची दिल्लीला बदली झाल्यामुळे राजकीय पक्षांना त्यांची उणीव जाणवेल असे सांगितले. भाजपचे पुंडलिक राऊत देसाई यांनी देखील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे राजकीय पक्षांना विशेषत: नामांकन भरणे आणि खाते राखण्यासाठी विविध प्रशिक्षण दिल्याबद्दल प्रशंसा केली. अशा प्रशिक्षणामुळे राजकीय पक्षांना खूप मदत होते, असे ते म्हणाले.

श्री. कुणाल, आयएएस यांनी लोकशाही प्रक्रिया आणि संस्थांची स्थापना आणि बळकटीकरण ही सरकार, मतदार आणि अधिकतर संघटित राजकीय शक्तींची समान जबाबदारी आहे, असे सांगितले. गोवा हे एक सुंदर राज्य आहे आणि गोव्यातील लोक शांतताप्रिय आहेत, असे त्यांनी सांगितले. निवडणूक यशस्वी आणि शांततेत पार पडल्याबद्दल सर्व राजकीय पक्षांचे आभार मानून त्यांचे अभिनंदन केले.
या बैठकीला कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आल्तिन गोम्स, भारतीय जनता पक्षाचे पुंडलिक राऊत देसाई, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे गौरव नाईक हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.