>> उपमहानिरीक्षक दीपक वर्मा यांची माहिती; 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये दलातील आत्महत्येच्या घटनांत 40 टक्के घट
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) होणाऱ्या आत्महत्या हा या दलासाठी एक अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे. ताणतणाव, दीर्घकाळ कुटुंबीयांपासून दूर रहावे लागणे व दैनंदिन कामातील वाढता ताण तसेच वैयक्तिक अन्य चिंतेचे विषय यामुळे या आत्महत्यांत वाढ होऊ लागली होती. मात्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ह्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी परिणामकारक पावले उचलली असून, त्यामुळे 2024 ह्या सरत्या वर्षांत केंद्रीय लष्करी पोलीस दलात होणारी आत्महत्येची प्रकरणे कमी झाल्याचे आशादायी असे चित्र आहे, असे दलाचे उपमहानिरीक्षक दीपक वर्मा यांनी म्हटले आहे.
एनसीआरबी यांच्याकडून मिळालेल्या तपशीलवार माहितीनुसार, 2022 ह्या वर्षी हे आत्महत्येचे प्रमाण हे लाखामागे 12.4 टक्के एवढे होते. या आत्महत्येचे प्रमाण सीआयएसएफने 2024 ह्या वर्षी हे प्रमाण लाखामागे 9.87 टक्के एवढे कमी करण्यात यश मिळवले. 2023 च्या तुलनेत हे प्रमाण 40 टक्के एवढे कमी आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आत्महत्येचे हे प्रमाण राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे. सीआयएसएफने आपल्या दलातील सदस्यांच्या मानसिक आरोग्याकडे क्रियाशीलपणे लक्ष दिल्याने आत्महत्येचे हे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे, असे वर्मा यांनी पुढे स्पष्ट केले.
वैयक्तिक भेटीगाठी व संवाद
दलातील कमांडिंग ऑफिसर्स आता आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांशी ‘नो युवर मेन अँड हिअर युअर मेन’ या संकल्पाखाली थेट संवाद साधू लागले आहेत. तणावग्रस्त व द्विधा मनस्थितीत असलेल्यांशी संवाद साधून त्यांना समजून घेण्याचे काम कमांडर्स आता रोज करू लागले आहेत, अशी माहिती वर्मा यांनी दिली.
तणाव व्यवस्थापन कार्यक्रम
तणाव व्यवस्थापनासाठी रोज योग वर्गांचे आयोजन करण्यात येत असून योग वर्ग घेण्याची जबाबदारी सीआयएसएफमधील 650 योग प्रशिक्षित शिक्षकांवर सोपवण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रत्येक युनिटमध्ये एका योग प्रशिक्षकाची सोय करण्यात आली असल्याचे वर्मा यांनी नमूद केले.
क्रीडा प्रकारांचे आयोजन
दर एका युनिटमध्ये जवान तसेच अधिकारी यांच्यासाठी रोज एका तासाचे क्रीडा सत्र आयोजित करण्यात येत असते, अशी माहितीही वर्मा यांनी दिली.
ऑनलाईन तंटा निवारण पोर्टल
दलात एका ऑनलाईन तंटा निवारण पद्धतीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे सर्व स्तरांवर खास लक्ष ठेवले जात असून, त्याद्वारे तंटा व तक्रार निवारणाचे काम केले जात आहे, अशी पुस्तीही वर्मा यांनी जोडली.
मन प्रकल्प
मन प्रकल्पाद्वारे 24 बाय 7 मानसिक आरोग्यासाठी टेली काऊन्सिलिंग व वैयक्तिक समुपदेशन केले जात आहे. या सेवेचा 2024 मध्ये सुमारे 4200 जणांनी फायदा घेतला. याशिवाय दर एका व्यक्तीसाठी ‘वन टू वन’ अशा प्रकारेही सेवा देण्यात येत असते. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे, असे वर्मा हे पुढे म्हणाले.
एआयआयएसएसतर्फे मानसिक आरोग्याचा अभ्यास
नवी दिल्ली येथील एआयआयएमएसच्या विद्यमाने मानसिक आरोग्यासंबंधीचा व्यापक असा अभ्यास करण्यात आला असून या अभ्यासाच्या आधारे आवश्यक त्या कृतींची शिफारस करण्यात आली आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
चांगल्या कामकाज आणि जीवन संतुलनासाठी नवे भरती धोरण
सीआयएसएफच्या मुख्यालयात हल्लीच केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की वैयक्तिक तक्रारींपैकी दोन तृतीयांश एवढ्या तक्रारी ह्या पोस्टिंगशी संबंधित होत्या व त्यामुळे वैयक्तिक जीवनावर परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवर चर्चा करून एक नवे मानव संसाधन धोरण डिसेंबर 2024 मध्ये अधिसूचित करण्यात आले. चांगल्या व संतुलित कामकाज जीवनासाठी स्वतःला पाहिजे अशा पोस्टिंगची निवड करणे असे हे नवे भरती धोरण आहे. या धोरणाचा महिला, विवाहित जोडपी व निवृत्तीच्या वाटेवर असलेल्यांना चांगला फायदा होणार आहे, असा विश्वासही वर्मा यांनी व्यक्त केला.