उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एका महिन्याच्या आत दुसऱ्यांदा रेल अपघात घडवून आणण्याचा कट उधळून लावण्यात यंत्रणांना यश आले आहे. रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास कानपूर ते शिवराजपूर दरम्यान रेल ट्रॅकवर सिलेंडर ठेवून त्याचा स्फोट घडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. लोको पायलटच्या सतर्कतेने मोठे संकट टळले. रेल ट्रॅकवर एक एलपीजी गॅस सिलेंडर उलटा ठेवला होता. त्यानुसार सिलेंडर स्फोट करून रेलगाडी उडवण्याचा प्रयत्न असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास कालिंदी एक्स्प्रेस अनवरगंज-कासगंज मार्गावर बर्राजपूर आणि बिल्हौर दरम्यान ट्रॅकवर एलपीजी गॅस सिलेंडर, काचेच्या बाटलीत ज्वलनशील पदार्थ आणि पांढऱ्या रंगाचे रसायन देखील सापडले. या एक्स्प्रेसच्या लोको पायलटने सिलेंडर पाहून इमर्जन्सी ब्रेक लावला, मात्र ट्रेन वेगात असल्याने ती सिलेंडरला धडकली, या धडकेत सिलेंडर बाजूला जाऊन पडला. मात्र त्यानंतर सिलेंडर न फुटल्याने अनेकांचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताना दहशतवादी विरोधी पथक आणि इतर तपास यंत्रणांच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तपास सुरु केला. दहशतवादीविरोधी पथकाच्या कानपूर आणि लखनऊमधील तुकड्या घटनास्थळी पोहचल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनवरगंज पोलीस स्थानकाचे अधीक्षक, आरपीएफ आणि अन्य रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.