>> 10 ते 12 गॅस सिलिंडर स्फोटाने आग
>> आगरवाडा येथील घटना, एकजण जखमी
बार्देश तालुक्यातील आगरवाडा-कळंगुट येथे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीत जवळपास 70 झोपड्या जळून भस्मसात झाल्या. तसेच आगीत भाजल्यामुळे एकजण जखमी झाल्याचा प्रकार काल रविवारी दुपारी घडला. प्राथमिक टप्प्यात अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार किमान 10 ते 12 सिलिंडरचा स्फोट झाला असून स्थानिकांनी आणि अग्निशामक दलाच्या पथकाने या आगीतून 24 सिलेंडर बाहेर काढले.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर लागलेल्या आगीची झळ तेथे असलेल्या सुमारे 70 हून जास्त झोपड्यांना पोहचली आहे. या आगीच्या घटनेत एकजण भाजून जखमी झाला. पिळर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर यांनी या घटनेची माहिती दिली. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जखमी व्यक्तीला कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदरच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पिळर्ण, म्हापसा, पर्वरी आणि पणजी येथील अग्निशामक दलाच्या वाहनांनी प्रयत्न केले. सुमारे 45 हून अधिक जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धैर्याने काम करताना दिसत होते. जवानांनी आपला जीव धोक्यात घालून सुमारे दीड तासाच्या मेहनतीनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.
कळंगुट आगरवाडा येथे एकमेकांना लागून असलेल्या या झोपडपट्टीतील एका झोपडीत प्रथम सिलिंडरचा स्फोट झाला. त्या भडक्याने शेजारील इतर झोपड्या पेटल्या. तेथील सिलिंडरचाही स्फोट होऊ लागला आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी धाडसाने या आगीदरम्यान काम केले. काही सिलिंडर तापलेले होते. जवानांनी हे सिलिंडर तेथून हटवले. आगीच्या झळा लागल्याने बाहेर काढलेले हे सिलिंडर फुगलेल्या अवस्थेत दिसत होते. या सिलिंडरचा पुन्हा स्फोट होऊ नये म्हणून काळजी घेतली जात होती.
आगरवाडा येथील हा झोपडपट्टी परिसर दाटीवाटीचा आहे. एकमेकांना खेटून असलेल्या या झोपड्यांपर्यंत पोहोचणेही मुश्किल झाले होते. आतील भागात असलेल्या झोपड्यांतील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. अग्निशामक दलाचा बंब आत जाऊ शकत नसल्याने इतर पर्याय वापरण्यात आल्याची माहिती दलाच्या जवानांनी दिली.
एकेका झोपडीत 3-3 सिलिंडर
अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच झोपडीत अनेक सिलिंडर होते. येथील एका-एका झोपडीत तीन किंवा त्याहून जास्त सिलिंडर असल्याचेही आढळून आले. घटनेत सर्वच झोपड्या जवळजवळ पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.