>> 21 दिवसांचा ‘फर्लो’ मंजूर; 16 युवतींच्या खुनाचा आरोप; 14 वर्षांपासून भोगतोय जन्मठेपेची शिक्षा
राज्यातील काही युवतींच्या खून प्रकरणांमध्ये गेली 14 वर्षे तुरुंगात शिक्षा भोगत असलेला सिरियल किलर महानंद नाईक याला तुरुंग प्रशासनाने 21 दिवसांचा ‘फर्लो’ मंजूर केला आहे. या फर्लो मंजुरीमुळे गेली कित्येक वर्षे तुरुंगात शिक्षा भोगणारा सिरियल किलर महानंद नाईक प्रथमच तुरुंगातून बाहेर येणार आहे.
राज्यात वर्ष 2009 मध्ये युवतींच्या खून प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी अटक केलेल्या महानंद नाईक याने 16 युवतींच्या खुनाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याला काही खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे.
फोंडा पोलिसांना शिरोडा येथील एका युवतीवरील बलात्कार प्रकरणाचा तपास करताना महानंद नाईककडून करण्यात येणाऱ्या युवतींच्या खुनाचे कारनामे उघड झाले. फोंडा पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी युवतीच्या खून प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका निभावली होती. राज्यातील 16 युवतींच्या खून प्रकरणी महानंद नाईक याच्याविरोधात गुन्हे दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आली होती.
1995 ते 2009 या काळात 16 युवतींचा खून केल्याचा आरोप महानंद नाईक याच्यावर ठेवण्यात आला होता. महानंद हा फोंडा येथे भाडोत्री रिक्षा चालविण्याचे काम करीत होता. युवतींशी मैत्री करून त्यांना तो लग्नाचे आमिष दाखवत होता. ओळख वाढल्यानंतर युवतींना घरातून सोन्याचे दागिने आणण्यास सांगायचा. दागिने मिळाल्यानंतर त्या युवतींना फिरण्याचा बहाणा करून निर्जनस्थळी नेत दुपट्ट्याने गळा आवळून त्यांचा खून करायचा, असे पोलीस तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे महानंद नाईक याला दुपट्टा किलर म्हणूनही ओळखले जात होते.
वासंती नाईक हिच्या खून प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने महानंद नाईक याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा ठोठावली होती. जिल्हा न्यायालयाने दिलेली शिक्षा उच्च न्यायालयाने उचलून धरली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली.
यापूर्वीही मंजूर झाला होता फर्लो; पण…
तुरुंग समितीने महानंद नाईक याला वर्ष 2018 मध्ये 21 दिवसांचा फर्लो मंजूर केला होता. त्यावेळी 1 लाख रुपयांची हमी आणि हमीदार देण्याची अट घातली होती. तथापि, स्थानिक हमीदाराने माघार घेतल्याने तो फर्लोवर तुरुंगातून बाहेर येऊ शकला नव्हता.
जन्मठेपेच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयानेही उठवली होती मोहोर
फोंडा येथील वासंती गावडे खून प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा पहिल्यांदा उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली. त्याला तीन प्रकरणांमध्ये शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे, तर काही प्रकरणांमध्ये तो निर्दोष सुटला आहे. दोन प्रकरणांमध्ये तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
फर्लो म्हणजे काय?
फर्लो हा केवळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यालाच मिळू शकतो. ज्या कैद्याला जन्मठेपेची शिक्षा किंवा अधिक कालावधीची शिक्षा सुनावलेली असते, त्यालाच ठराविक काळानंतर कोणत्याही कारणाशिवाय तुरुंगाबाहेर येण्याची मुभा दिली जाते. फर्लो हा कैद्याचा अधिकार आहे असे मानले जाते. कैद्याला दिलेला फर्लोचा कालावधी त्याच्या शिक्षेची माफी मानला जातो.
पॅरोल म्हणजे काय?
पॅरोल हा कोणताही कैदी किंवा शिक्षा भोगत असलेल्या कैद्यालाही मिळू शकतो. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबातील सदस्याचे लग्न किंवा अन्य महत्त्वाच्या कारणासाठीच पॅरोल मंजूर केला जातो. पॅरोल नाकारलाही जाऊ शकतो. मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले दोषी, दहशतवादी किंवा फरार होण्याची शक्यता असलेल्या कैद्यांना पॅरोल नाकारला जातो.