सिरम इन्स्टिट्यूटमधील आगीत ५ मृत्युमुखी

0
171

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये काल लागलेल्या आगीत पाचजणांचा होरपळून मृत्यू झाला. आग नियंत्रणात आणल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना सहाव्या मजल्यावर हे पाच मृतदेह आढळून आले. दुपारी आणि संध्याकालीअशीदोन वेळा ही आग लागल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

सिरम कंपनीमध्ये बीसीजी प्लांटच्या इमारतीतील तिसर्‍या मजल्यावर दुपारी दीडच्या सुमारास ही भीषण आग लागली. याबाबत माहिती मिळताच पुणे पालिकेच्या अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेत आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यावेळी सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी आगीत अडकलेल्या सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले असून आगीत कोणीही जखमी झाले नसून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ट्विट केले होते. मात्र त्यानंतर काही वेळातच यात पाचजणांना होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले. आग आटोक्यात आल्यानंतर इमारतीत तपासणी केली असता पाच मृतदेह आढळून आले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

सहाव्या मजल्यावर मृतदेह
ही इमारत सहा मजली असून आग लागल्यानंतर सुरुवातीला आतमध्ये चार जण अडकले अशी माहिती मिळाली होती. त्यांना दलाच्या जवानांनी बाहेर काढले. मात्र, आग आटोक्यात आल्यानंतर शेवटच्या मजल्यावर जवान पोहोचले असता तो मजला जळून खाक झाल्याचे स्पष्ट झाले. आणि तिथेच हे पाच मृतदेह आढळले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
या इमारतीचे बांधकाम चालू होते. वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडून आग लागली असावी असा तर्क करण्यात येत आहे.

वेल्डिंग ठिणगीमुळे आग
इमारतीच्या एका मजल्यावर बांधकाम चालू होते. त्यावेळी तिथे वेल्डिंग करण्यात येत होते. वेल्डिंगच्या ठिणगीमुळे ही आग लागली असावी ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग अधिकच भडकल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. संपूर्ण आग विझवण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागला. कोविशील्ड लशीची इमारत आगीच्या ठिकाणापासून लांब आहे. त्यामुळे या इमारतीचे व लशीचे कोणतेही नुकसान झालेले नाही. याप्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याचे आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले.

पुन्हा लागली आग
दुपारी लागलेली आग विझवल्यानंतर त्याच इमारतीत संध्याकाळी पुन्हा एकदा आग लागली. मात्र घटनास्थळी त्वरित धाव घेत अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझवली.
प्रत्येकी २५ लाख ः पुनावाला
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी जाहीर केली आहे.

दुर्दैवी घटना ः मोदी
सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही दुर्दैवी घटना असून यावेळी झालेल्या जीवितहानीचे आपल्याला दुःख झाले आहे असे पंतप्रधान नरेद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.