सिनेरसिकांची मांदियाळी

0
188

– मनस्विनी प्रभुणे
जगभरातून- विविध देशांमधून येणारे चित्रपट, त्यांचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी साधता येणारा संवाद, होणारे विचारमंथन, झडणारी चर्चा हे सारं फिल्म फेस्टिव्हलमध्येच अनुभवण्यास मिळतं. एरवी आपल्या सिनेमागृहांमध्ये हे बघायला मिळत नाही. भारतात प्रदर्शित होत नाहीत असे सारे चित्रपट बघण्याची संधी ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मुळे मिळू लागली आहे. चित्रपट हे साधन ‘मनोरंजना’साठी की ‘प्रबोधना’साठी हा वाद कायमचा आहे. दोन्हीही मुद्यांवर तेवढ्याच ठामपणे लढणारे अनेक जण आहेत, पण इफ्फीसारख्या महोत्सवात आल्यानंतर इथे चित्रपट बघून आपला चित्रपटांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. कोणत्याही भाषेच्या, संस्कृतीच्या भिंती हे माध्यम समजून घेताना आड येत नाही. एक वैश्‍विक अनुभव या सर्व चित्रपटांमधून घ्यायला मिळतो.‘इफ्फी’ हे नाव तसं गोमंतकीयांसाठी नवीन राहिलेलं नाही. पण काही वर्षांपूर्वी मात्र ‘इफ्फी’सारख्या महोत्सवाचेेेेेेे आयोजन आपल्यासाठी नसून देशभरातून- जगभरातून येणार्‍या सिनेरसिकांसाठी आहे असे काहींचे मत ऐकायला मिळायचे. पण हेच विचार हळूहळू बदलू लागले आहेत. इफ्फीच्या सगळ्या प्रक्रियेत गोमंंतकीय चेहरे दिसू लागलेत. आवाज ऐकू येऊ लागलाय. कॅटलॉग घेण्यासाठी लोक तासन्‌तास रांगेत थांबू लागलेत. जसा गोव्यात चवथीचा सण, डिसेंबरमध्ये साजरा होणारा ‘सेंट झेविअर दर्शन’सोहळा, जात्रा या सार्‍यांप्रमाणेच ‘इफ्फी’चं महत्त्व इथं वाढत चालल्याचं दिसू लागलंय.
‘इफ्फी’ कायमस्वरूपी स्थिरावला
दरवर्षी ‘इफ्फी’ गोव्यातून हलवणार अशा वावड्या उठायच्या. गोवा हे इफ्फीसाठी कायमस्वरूपी स्थान असू नये असं अनेक जणांना वाटत होतं. त्यासाठी चित्रपटसृष्टीतील एक लॉबीही कार्यरत होती. परंतु गोव्यातून मिळणारा प्रतिसाद, उभ्या राहू शकत असलेल्या सोयी-सुविधा आणि परदेशी चित्रपटरसिकांना आकर्षित करणारे गोव्याचे सृष्टिसौंदर्य यामुळे गोवा हेच कायमस्वरूपी स्थान राहावे असेही अनेकांचे मत होते. यंदाच्या वर्षी तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोवा हेच इफ्फीसाठी कायमस्वरूपी आयोजन करणारे स्थान असेल अशी घोषणा करून ‘इफ्फी’ला स्थिरावण्यासाठी हक्काची जागा मिळवून दिली आहे. आता ‘इफ्फी’च्या आयोजनात आणखी काही सुधारणा घडवून आणण्याची संधी मिळू शकेल.
रक्षामंत्री मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा गोव्याला ‘इफ्फी’चे आयोजन करण्याचा मान मिळाला. आणि पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असतानाच गोवा हेच ‘इफ्फी’चे घर असेल, इफ्फी इथेच स्थिर होईल अशी हमीदेखील मिळाली. त्यामुळे ‘इफ्फी आणि पर्रीकर’ अशीही एक नाळ इथे जुळलेली दिसून येते. परवा झालेल्या उद्घाटन सोहळ्यात रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीची समस्त गोमंतकीय जनतेने घेतलेली दखल खुद्द अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यादेखील लक्षात आली असेल. जेवढ्या टाळ्या अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासाठी वाजवल्या गेल्या, त्याहून कैक पटीने अधिक टाळ्या मनोहर पर्रीकर यांच्यासाठी वाजवल्या गेल्या. आपल्या जनमानसातील ‘रिअल हिरो’ला इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित असलेले बघून समस्त प्रेक्षकवर्ग खूश होता.
राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सिनेमांची पर्वणी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिनेमा बघायला मिळतात हेच या प्रकारच्या फेस्टिव्हलचे महत्त्व असते. यावर्षी आंतरराष्ट्रीय विभागात १६५ सिनेमा वेगवेगळ्या देशांमधून निवडले असून ११० सिनेमा इंडियन पॅनोरमामध्ये आहेत, म्हणजेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील २७५ चित्रपट बघण्याची संधी या इफ्फीत मिळत आहे. शिवाय फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या २३ व अन्य काही मान्यवरांनी बनवलेल्या ६ डॉक्युमेंटरींचा समावेश यंदाच्या इफ्फीमध्ये आहे.
कन्ट्री फोकस- चीन
कन्ट्री फोकसमध्ये चीनमधील चित्रपट बघायला मिळणार आहेत. यामध्ये एकूण नऊ चित्रपटांचा समावेश करण्यात आला असून २०१२ ते २०१४ या काळातील नव्या-ताज्या चित्रपटांना यामध्ये दाखवण्यात येत आहे. ‘अमेरिकन ड्रिम्स इन चायना’, ‘बिजिंग ब्ल्यूज’, ‘कॉट इन द वेब’, ‘फेंगसुई’, ‘फाइंडिंग मि. राईट’ यांसारख्या चित्रपटांमधून युवापिढी, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, जीवनाकडून असलेल्या अपेक्षा यांचे चित्रण आहेच. यासोबत चीनमधील युवापिढीचे प्रतिबिंब बघायला मिळेल. सार्‍या जगाचे लक्ष सध्याच्या काळात चीनकडे लागले असताना त्यांचे चित्रपट समजून घेण्यासाठी सिनेरसिक उत्सुक आहेत.
मराठी चित्रपटांचा झेंडा
गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला झेंडा रोवला आहे. अनेक पुरस्कार मिळवलेत. यंदा एकूण आठ मराठी चित्रपट व चार डॉक्युमेंटरी दाखवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे जवळजवळ सर्वच चित्रपट हे युवा दिग्दर्शकांनी बनवलेले असून त्यातील अनेकांचे पहिलेच चित्रपट आहेत. आपल्या पहिल्याच कलाकृतीत आपला ठसा उमटविणार्‍या युवा दिग्दर्शकांचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.
एक हजाराची नोट – श्रीहरी साठे, डॉ. प्रकाश आमटे – समृद्धी पोरे, किल्ला – अविनाश अरुण, लोकमान्य ः एक युगपुरुष – ओम राऊत, या सार्‍या दिग्दर्शकांचे हे सर्व पदार्पणातील चित्रपट आहेत. पण एकदम छाप सोडून जाणारे. मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा विचार, नवा प्रवाह घेऊन येणारी ही पिढी आणि त्यांचे चित्रपट नक्कीच बघावे आणि एक वेगळा अनुभव घेऊन जावा असे आहेत. यासोबत महेश लिमये यांचा ‘येलो’ आणि ‘हरिश्‍चंद्राची फॅक्टरी’मुळे नावारूपाला आलेले परेश मोकाशी यांचा बहुचर्चित ‘एलिझाबेथ एकादशी’ हे चित्रपटदेखील अवश्य बघावेत असे आहेत. इंडियन पॅनोरमाची सुरुवात करण्याचा मान ‘एलिझाबेथ एकादशी’ला मिळाला. त्यातील मुलांच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केलेय. एक छोटासा विषय घेऊन त्यातून लहान मुलांचे भावविश्‍व उलगडून दाखवताना परेश मोकाशींनी या चित्रपटाला कुठेही ‘बाल चित्रपट’ बनवलाय असे वाटू दिले नाही.
महिला आणि चित्रपट व महिलांनी बनवलेला चित्रपट
महिला आणि चित्रपट व महिला दिग्दर्शकांनी बनवलेला चित्रपट हे कायमच अभ्यासाचे, उत्सुकतेचे विषय बनून समोर आले आहेत. इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षी याची दखल एका वेगळ्या पद्धतीने घेण्यात आली आहे. ‘नॉर्थ- ईस्ट’मधील महिलांची कहाणी’ अशा एका वेगळ्या पद्धतीने महिलांचा प्रातिनिधिक चेहरा चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. एका छोट्याशा खिडकीतून एक विस्तीर्ण आगळ्यावेगळ्या- सांस्कृतिक पार्श्‍वभूमीने संपन्न असलेल्या नॉर्थ-इस्टमधील महिलांची प्रतिमा आणि प्रतिबिंब बघायला मिळत आहे. आसाम, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांमधील तिथल्या भाषेतील या चित्रपटांच्या माध्यमातून महिलाविश्‍वाची मांडणी करणार आहेत.
दादासाहेब फाळके विजेत्या कलाकारांचे चित्रपट
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणार्‍या सर्व कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार यांचे चित्रपटांचे स्पेशल स्क्रिनिंग यावर्षी आयोजित केले असून यामध्ये गुलजार यांच्या चित्रपटांना विशेष स्थान देण्यात आले आहे. ‘आँधी’, ‘अँगूर’, ‘इजाजत’, ‘कोशिश’, ‘लेकिन’, ‘लिबास’, ‘माचिस’, ‘मेरे अपने’ इत्यादी सिनेमा म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच आहे.
याशिवाय लता मंगेशकर, आशा भोसले, दिलीपकुमार, मृणालसेन, गोपालकृष्णन, श्याम बेनेगल, आर. रामानायडू, के. बालचंदर आणि सौमित्र चटर्जी या दादासाहेब पुरस्कार विजेत्यांच्या चित्रपटांनादेखील येथे दाखविण्यात येणार आहे.
दहा दिवस फक्त सिनेमा सिनेमा
पणजीमध्ये पुढचे दहा दिवस फक्त सिनेमा आणि सिनेमा. कुठेही तुम्ही जा, इफ्फीमधील डेलिगेट्‌स नजरेस पडतात. सगळीकडे चर्चा इफ्फीचीच. सिनेमा बघणं, त्यावर होणारी चर्चा, कलाकारांशी होणारा संवाद या सगळ्याचा एक वेगळाच अनुभव असतो. सिनेमाच्या ओढीने जगभरातून- देशभरातून येणारे रसिक, त्यांच्यासाठी सजलेले पणजी शहर… सारे काही सिनेमामय झाले आहे. पुढचे दहा दिवस भरगच्च अशा वेळापत्रकात इफ्फीच्या आयोजन समितीने विविध देशांतील विविध चित्रपटांची निवड करून खास रसिकांसाठी त्यांचे आयोजन केले आहे. वेळ काढून यातील चित्रपट फक्त बघायचेय. त्या चित्रपटांच्या माध्यमातून त्या-त्या देशांना, त्यांच्या संस्कृतीला, तिथल्या समस्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.