सिद्धी शेटकरचा उपचारादरम्यान मृत्यू

0
12

मांद्रेतील अपघातात झाली होती गंभीर जखमी

मांद्रे येथे शनिवारी भीषण अपघात होऊन भावजय आणि नणंद यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सिद्धी शेटकर (17) ही गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर गेल्या तीन दिवसांपासून बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू होते; मात्र काल सायंकाळी उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. सिद्धी शेटकर ही हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण घेत होती.

सविस्तर माहितीनुसार, मांद्रे पंचायतीजवळ आस्कावाडा-मांद्रे येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सानिका सुभाष खर्बे (19) आणि प्रियांका संदेश खर्बे (29) यांचा जागीच मृत्यू झाला होता. पिकअप-टेम्पोचालकाने अचानक ब्रेक लावल्याने त्यांच्या दुचाकीची धडक बसली आणि त्या तिघीही रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली त्या सापडल्या. या अपघातात सिद्धी शेटकर ही गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. सिद्धी ही बरी होईल, अशी नातेवाईकांची अपेक्षा होती; परंतु तीही गंभीरित्या जखमी झाल्याने तिने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. काल सायंकाळी 6 च्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

प्रियांका खर्बे आणि सानिका खर्बे यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या बाजूने गंभीर जखमी असलेली सिद्धी शेटकर ही लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली होती.
सिद्धी शेटकर हिचा मोठा परिवार आहे. आई-वडील, दोन लहान बहिणी, काका-काकी असा मोठा परिवार आहे. मंगळवारी दुपारी 12 नंतर स्थानिक स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, हरमल पंचक्रोशी विद्यालयात तिला मंगळवारी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.