सिद्दिकी फरारच; पोलिसाची शरणागती

0
4

>> जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपीचे पोलीस शिपायाच्या मदतीने पलायन; अमित नाईक हुबळी पोलिसांसमोर आला शरण

राज्यात उघडकीस आलेल्या जमीन घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याने पहाऱ्यासाठी असलेला भारतीय राखीव दलाचा (आयआरबी) एक शिपाई अमित नाईक याच्या मदतीने गुन्हा अन्वेषण पोलिसांच्या कोठडीतून काल भल्या पहाटे 2.30च्या दरम्यान पलायन केल्याने एकच खळबळ उडाली. शिपाई अमित नाईक याने कोठडीचे कुलूप उघडून आरोपी सुलेमान खान याला बाहेर येण्यास मदत केली. त्यानंतर आपल्या मोटारसायकलवरून सुलेमानने पोबारा केला. तसेच अमित नाईक हा देखील फरार झाला. त्यानंतर काल रात्री उशिरा अमित नाईक हा हुबळी पोलिसांना शरण आला; त्याला ताब्यात घेण्यासाठी गुन्हा अन्वेषणचे एक पथक हुबळी रवाना झाले आहे. पहाऱ्यावर असलेल्या पोलीस शिपायानेच आरोपीला कोठडीतून बाहेर काढून त्याला पलायन करण्यात मदत केल्याने त्याची राज्यभर चर्चा रंगली होती.

राज्यात झालेल्या जमीन घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी असलेल्या सुलेमान खान याला पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) 26 नोव्हेंबर 2024 रोजी जमीन घोटाळा प्रकरणातील त्याचा सहभाग असलेल्या कित्येक प्रकरणांपैकी आणखी एका जमीन घोटाळा प्रकरणी त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर त्याला पुन्हा अटक केली होती. त्याला गुन्हा अन्वेषणने आपल्या कोठडीत ठेवले होते. गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान पूर्वनियोजित कट रचत अमित नाईकच्या मदतीने सुलेमान तुरुंगातून बाहेर पडत पलायन केले. खान याच्यावर वेगवेगळ्या पाच जमीन घोटाळा प्रकरणी गुन्हे नोंद झालेले आहेत. त्याच्याविरूद्ध खुनाचेही आरोप आहेत.

पोलीस शिपाई अमित नाईकयाच्या मदतीने सुलेमान खान पोलीस कोठडीतून पळून जाण्याची जी घटना घडली आहे, त्याबाबत कोठडी प्रशासनाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती काल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, गेल्या सुमारे साडेचार वर्षांपासून फरार असलेल्या सुलेमान खान याला एसआयटीने हुबळी येथे अटक केली होती. त्याच्यावर खून, खुनी हल्ला, जमीन हडप प्रकरणे आदी मिळून देशातील विविध भागांत 15 गुन्हे नोंद झालेले आहेत.

सिद्दिकीला व्हीआयपी वागणूक दिल्याच्या वृत्ताचे खंडन
गुन्हा अन्वेषण पोलिसांच्या कोठडीत असताना आरोपी सुलेमान खान याला व्हीआयपीसारखी वागणूक देण्यात येत असे, या वृत्ताचे काल पोलिसांनी खंडन केले. तसे निवेदन पोलिसांनी जारी केले आहे.

आता सीसीटीव्हीचा आधार
आरोपीने पूर्वनियोजित डाव साधून हे पलायन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुलेमान खान व पोलीस शिपाई अमित नाईक हे कोणत्या दिशेने पसार झाले आहेत, त्याचा सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने माग घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले होते.

4 पोलीस पथके कर्नाटकात रवाना
सुलेमान खानच्या शोधासाठी 4 पोलीस पथके कर्नाटकात रवाना करण्यात आली असून, त्याचा कसून शोध सुरू आहे.

कोठडीतून कसे केले पलायन?
सुलेमान खान याने अमित नाईक याच्या मदतीने काल सकाळी 2.30 वाजता कोठडीतून पलायन केले. मात्र, ही घटना सकाळी 5 वाजता उघडकीस आली. त्यामुळे वरील दोघांनाही दूर पळून जाण्यास बराच वेळ मिळाला.
या घटनेची माहिती मिळताच जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या पोलिसांनी, तसेच गुन्हा अन्वेषण पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

उपमहानिरीक्षकांकडून कडक कारवाईचा इशारा
गुन्हा अन्वेषण पोलिसांच्या कोठडीतून कॉन्स्टेबल अमित नाईक यांच्या मदतीने पळून गेलेला सुलेमान खानचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या प्रकरणी रितसर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची खोलवर चौकशी केली जाणार असून, तसे आदेश देण्यात आले आहेत, असे पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी काल स्पष्ट केले.
फरार पोलीस अमित नाईक याच्याबरोबरच अन्य ज्या पोलिसांकडून हलगर्जीपणा झालेला आहे, त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.
आरोपी सुलेमान खान व शिपाई अमित नाईक यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यासाठी शेजारी राज्यांतील पोलिसांचीही मदत घेण्यात येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

चौकीदारच चोर : काँग्रेस
या घटनेवरून काँग्रेस पक्षाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या घटनेतून ‘चौकीदारच चोर आहे’ हे स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी टीका केली आहे.

राज्य पुरस्कृत अराजकता : अमित पाटकर
पोलीस शिपायानेच एका गुन्हेगाराला अशा रितीने पोलीस कोठडीतून पळून जाण्यास मदत करणे म्हणजे राज्य पुरस्कृत आराजकता होय, अशी टीका प्रतिक्रिया गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

पोलीस गुन्हेगारांचे एजंट : आलेमाव
राज्यातील पोलीस हे गुन्हेगारांचे एजंट असल्याप्रमाणे वागू लागले आहेत. पोलीस गुन्हेगारांशी हातमिळवणी करू लागले असल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली असल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल केली.

ॲड. अमित पालेकर यांचे गंभीर आरोप
जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपीवर नजर ठेवण्यासाठी एकाच पोलीस शिपायाची नेमणूक का केली, असा सवाल आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी काल केला. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्या पोलिसाने हे कृत्य केले असावे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी गुन्हा अन्वेषणच्या अधीक्षकांना त्वरित निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली.