जमीन घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याच्या अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळविण्याच्या हेतूने गोवा पोलिसांच्या एसआयटीने येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून, या प्रकरणी निवाडा येत्या 3 मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे. जमीन घोटाळा प्रकरणातील सिद्दिकीने एका आयआरबी पोलिसाच्या मदतीने पोलीस कोठडीतून पलायन केल्यानंतर गोवा पोलिसांनी त्याला केरळमध्ये पुन्हा अटक केली होती. पलायन प्रकरणात सिद्दिकीची जुने गोवे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांच्या एसआयटी विभागाला सिद्दिकीची जमीन घोटाळा प्रकरणात चौकशी करायची आहे. त्यामुळे एसआयटीने येथील जिल्हा व सत्र न्यायालयात त्याला पोलीस कोठडी द्यावी, या मागणीसाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, म्हापसा येथील एका जमीन घोटाळा प्रकरणात अटक केलेल्या सिद्दिकी खान याची पत्नी अफसाना खान आणि आणखी एका संशयिताला गोव्याबाहेर जाण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या प्रकरणात अफसाना खान हिची सशर्त जामिनावर सुटका झाली आहे.