गुन्हा अन्वेषण पोलिसांच्या कोठडीतून पळून गेलेला आरोपी सिद्दिकी उर्फ सुलेमान खान हा नेमका कुठे लपून बसला असावा, यासंबंधीची बरीच माहिती आमच्या हाती आलेली आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे काल पोलीस महासंचालक आलोककुमार यांनी स्पष्ट केले.
फरार सिद्दिकीने व्हिडिओतून पोलिसांवर व राजकीय नेत्यांवर जे आरोप केलेले आहेत, त्या आरोपांची चौकशी केली जाणार का, असे पत्रकारांनी विचारले असता, सध्या आमचे प्राधान्य हे सिद्दिकीला अटक करणे हे आहे, असे आलोककुमार म्हणाले.
सिद्दिकीला अटक केल्यानंतर त्याने जे जे आरोप केले आहेत, ते खरे आहेत की त्याला अटक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांना विचलित करण्यासाठी त्याने ते केले आहेत, ते तपासून पाहिले जाणार असल्याचे आलोककुमार म्हणाले.
सिद्दिकी हा मोठा गुंड असून, त्याच्याविरुध्द विविध राज्यांतील पोलीस स्थानकात गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी अनेक पथकांची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तीन महिन्यांच्या एका विशेष मोहिमेनंतर पोलिसांनी सिद्दिकीला अटक केली होती. त्यापूर्वी तब्बल चार वर्षे तो फरार होता. अशा आरोपीने केलेल्या आरोपांवर किती विश्वास ठेवावा, असा प्रश्नही पोलीस महासंचालकांनी केला. त्याला पळून जाण्यास मदत केलेल्या पोलीस शिपाई अमित नाईक याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यात आणखी कुणाचा हात असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.