सिद्दिकीला पकडण्यात 10 दिवसांनंतरही पोलिसांना अपयश का? ः पणजीकर

0
0

गन्हा अन्वेषण पोलिसांच्या कोठडीतून पळून गेलेला जमीन घोटाळ्यातील आरोपी सुलेमान खान सिद्दिकी याला 10 दिवसांनंतरही पकडण्यास अपयश का आले आहे हे गोवा पोलिसांनी स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यानी केली आहे.

कोठडीतून पळून गेलेला गुन्हेगार सुलेमान खान सिद्दिकी हा राज्यात झालेल्या जमीन घोटाळा प्रकरणातील एक प्रमुख आरोपी आहे. त्याला विनाविलंब अटक करण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे. मात्र पोलीस अजून गप्प का आहेत, असा सवाल काल पणजीकर यांनी केला. एक आरोपी पोलीस कोठडीतू पळून जाऊ शकतो ही शरमेची बाब असून त्याला पळून जाण्यासाठी एक पोलीस शिपाई मदत करतो ही त्याहूनही शरमेची बाब असल्याचे पणजीकर
म्हणाले.

सुलेमान खान याने पलायन केले त्याला पोलीसच जबाबदार असून पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळेच तो पळून जाण्यात यशस्वी ठरला हे गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष व गोव्याचे भाजपचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले ते बरेच झाले. पण या प्रकरणी गोवा सरकारला दोष देता येणार नसल्याचे तानावडे म्हणतात ते कसे असा प्रश्नही पणजीकर यांनी केला आहे. पोलीस हे गृहखात्याखाली येतात याची जाणीव तानावडे यांना नाही का, असा सवाल पणजीकर यांनी केला आहे.