व्हिडिओ कसा मिळाला? भाजपचा विरोधकांना सवाल
पोलीस कोठडीतून फरार आरोपी सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याने तयार केलेला व्हिडिओ विरोधी पक्षांना कसा मिळाला, याची सविस्तर चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काल भाजपने केली. काल पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार दाजी साळकर, भाजपचे सचिव सिद्धेश नाईक व प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी ही मागणी केली.
सुलेमान खान यांच्या व्हिडिओची चौकशी व्हावी अशी सतत मागणी करणाऱ्या काँग्रेस व आम आदमी पार्टी यांच्याकडे हा व्हिडिओ कसा पोचला असा प्रश्न करून त्याची माहिती या विरोधकांनी द्यावी. तसेच या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करायला हवी, अशी मागणी काल वरील भाजप नेत्यांनी केली.
सुलेमान याला आमच्या सरकारने अटक केली. त्याच्या बेकायदा बांधकामावर आमच्या सरकारने कारवाई केली. त्यावेळी विरोधी पक्ष कुठे होते, असा सवाल यावेळी बोलताना सिद्धेश नाईक यांनी केला.पोलीस कोठडीतून पलायन केलेल्या सुलेमान खान याच्या मुसक्या आवळल्या जातील, असेही यावेळी भाजप नेत्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याने पहाऱ्यासाठी असलेला भारतीय राखीव दलाचा (आयआरबी) एक शिपाई अमित नाईक याच्या मदतीने गुन्हा अन्वेषण पोलिसांच्या कोठडीतून 13 डिसेंबरला भल्या पहाटे 2.30च्या दरम्यान पलायन केल्याने एकच खळबळ उडाली.ानंतर रविवारी सिद्दिकीचा एक व्हिडिओ विरोधकांनी व्हायरल केला होता. तसेच सिद्दिकीने केलेल्या आरोपांवरून राज्य सरकारवर टीकाही केली होती. दरम्यान, सिद्दिकी खान पलायन प्रकरणात गुन्हा विभागातील हवालदार सर्वेश खांडोळकर याला काल निलंबित करण्यात आले. कामात हयगय केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
सिद्दिकीचा जामीन अर्ज फेटाळला
राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याने म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज काल फेटाळून लावण्यात आला. गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने सिद्दिकी खान याला गेल्या नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. जमीन घोटाळ्याच्या विविध प्रकरणात सिद्दिकी खान याला अटक करण्यात आली होती. गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीत असताना सिद्दिकी खान याने म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. गेल्या 13 डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी संशयित आरोपी सिद्दिकी खान रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून पलायन केले. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.