सिद्दिकीचा 7 दिवसांनंतरही ठावठिकाणा लागेना

0
6

>> सिद्दिकीच्या अटकेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना पत्र

रायबंदर येथील गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून पलायन केलेल्या सराईत गुन्हेगार सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान (54) याचा सात दिवस उलटले, तरीद्द्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही. दरम्यान, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वरा यांना पत्र लिहून पोलीस कोठडीतून फरार सिद्दिकीला अटक करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून शुक्रवार दि. 13 डिसेंबरला पहाटे 2.30 च्या सुमारास जमीन घोटाळा प्रकरणातील सराईत गुन्हेगार सिद्दिकी खान याने आयआरबी पोलीस शिपायाच्या समवेत पलायन केले होते. त्यानंतर त्याच दिवशी रात्री पोलीस शिपाई अमित नाईक हा हुबळी पोलिसांना शरण आला होता. सिद्दिकीचा गोवा पोलिसांच्या पथकांकडून हुबळी व इतर भागात शोध घेतला जात आहे; पण सात दिवस उलटले तरी तो पोलिसांना सापडू शकलेला नाही. दरम्यानच्या काळात पोलीस महासंचालकांनी त्याचा ठावठिकाणा लागलेला असून, लवकरच त्याला अटक होईल, असे सांगितले होते; मात्र तो दावा फोलच ठरला.
आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सिद्दिकीच्या अटकेसाठी करावी, अशा आशयाचे विनंती पत्र कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना लिहिले आहे. हुबळी परिसरात सिद्दिकी लपून बसला असून, त्याला पुन्हा अटक करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती पत्रातून केली आहे.

सिद्दिकीने ॲड. अमित पालेकर यांच्या निवासस्थानी पाठविलेले व्हिडिओ काँग्रेसचे नेते सुनील कवठणकर यांनी सार्वजनिक केले होते. त्या व्हिडिओत सिद्दिकीने गोवा पोलिसांवर केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणात सुनील कवठणकर यांची मंगळवारी चौकशी केली होती. त्यानंतर आता ॲड. अमित पालेकर यांना गुरुवारी चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली होती; मात्र ते विदेश दौऱ्यावर असल्याने चौकशीसाठी हजर राहू शकलेले नाहीत. त्यामुळे जुने गोवे पोलिसांनी 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ॲड. पालेकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे.

अमित पालेकर यांची सोमवारी चौकशी
सिद्दिकी खान व्हायरल व्हिडिओ प्रकरणाच्या चौकशीसाठी जुने गोवे पोलिसांनी आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांना येत्या सोमवार दि. 23 डिसेंबर रोजी पोलीस स्थानकात हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे.

बडतर्फ पोलीस शिपायाचा जामिनासाठी अर्ज
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून सिद्दिकी खान पलायन प्रकरणात जुने गोवे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपी बडतर्फ आयआरबी पोलीस शिपाई अमित नाईक याने जामिनासाठी पणजी प्रथम वर्ग न्यायालयात अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर शुक्रवार दि. 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.