प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांची पदावरून उचलबांगडी केल्याच्या वृत्ताने कॉंग्रेस पक्षात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. मात्र अखिल भारतीय कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांचा आपल्याला आशीर्वाद असल्याचा दावा प्रदेश अध्यक्ष फर्नांडिस यांनी केला आहे. कॉंग्रेसच्या सर्वेेसर्वा सोनिया गांधी यांनी शनिवारी रात्री उशीरा फर्नांडिस यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिध्द झाले आहे. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनानुसारच आपण पक्ष स्वच्छ करण्याचे पाऊल उचलेले आहे, असे फर्नांडिस म्हणाले. वरील वृत्तामुळे काल सकाळपासून गोव्याच्या वेगवेगळ्या भागातील निष्ठावंत कॉंग्रेसजनांनी संपर्क साधून आपल्याला सहानुभूती व्यक्त केली आहे. पक्षाची प्रतिमा महत्वाची असते, असे ते म्हणाले.
माजी वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांची प्रदेश कार्यकारिणीवरून उचलबांगडी केल्यामुळे नाराज बनलेल्या त्यांच्या समर्थकांनीच वरील वृत्त पसरविले आहे. आपल्यावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही, असे फर्नांडिस म्हणाले. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांनी पक्ष स्वच्छ करण्याच्या नावांखाली पक्षातील प्रत्येक नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली होती. दहेज मिनरलचे भालचंद्र नाईक यांनी कॉंग्रेस भवनमध्ये येऊन प्रदेश अध्यक्षांच्या बरोबर बसून राणे पिता-पुत्रांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यामुळे जॉन फर्नांडिस बरेच वादग्रस्त ठरले होते. त्याविरुध्द पक्षश्रेष्ठींकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, आज सकाळी येथील कॉंग्रेस भवनमध्ये होणार्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतही वरील विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसमधील या हालचालीमुळे प्रदेश अध्यक्षही पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असल्याचे कळते. मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात प्रदेश समितीवर नव्या अध्यक्षांची नियुक्तीची घोषणा होण्याची शक्यता आहे. पक्ष स्वच्छ करण्याचे कामही शिस्तबध्द पध्दतीने झाले पाहिजे, असे पक्षाच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे.