सिक्कीममधील नथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले. ही घटना दुपारी 12.20 च्या सुमारास गंगटोकला नाथु ला पासशी जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर घडली. भारतीय लष्कराने आणि मदत-बचाव पथकाने 22 जणांची सुटका केली.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 4 पुरुष, 2 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या हिमस्खलनानंतर गंगटोकला नाथू ला याला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 22 पर्यटकांना बर्फाबाहेर काढण्यात आले आहे. त्यातील 11 जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना गंगगोट स्थित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटना घडलेल्या भागात 13 व्या मैलाच्या माइलस्टोनपर्यंत जाण्याचा पास जारी केला जातो. त्यापुढे जाण्याची परवानगी नाही; पण हे पर्यटक जवाहरलाल नेहरू मार्गावरील 14 व्या माईलस्टोनपर्यंत गेले. नेमका तिथेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.