गोव्याने सिक्किमवर ९ गडी राखून सहज मात करीत प्लेट गट रणजी चषक स्पर्धेतील आपल्या अभियानाचा प्रारंभ विजयश्रीने केला. सुयश प्रभुदेसाईची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली. या सामन्यात गोव्याने बोनस गुण मिळविण्याची संधीही गमावली. विजयामुळे गोव्याने आपल्या पहिल्या लढतीतच पूर्ण ६ गुण मिळविले. आता गोव्याचा दुसरा सामना १७ ते २० डिसेंबरपर्यंत मेघालयाविरुद्ध होणार आहे.
पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्याच्या काल चौथ्या दिवशी ८ बाद ३३१ धावांवरून पुढे खेळताना सिक्किमचा दुसरा डाव १११.३ षट्कांत ३७४ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार अमित वर्माने सिक्किमचे उर्वरित दोन्ही फलंदाज तंबूत पाठविले. त्याने पाल्जोर तामंगला (३६) दर्शन मिसाळकरवी झेलबाद केले. तर नंतर इक्बाल अब्दुल्लाला स्नेहल कवठणकरकडे झेल देण्यास भाग पाडले. सिक्किमकडून व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळणार्या अष्टपैलू अब्दुल्लाने १० चौकार व ६ षट्कारांच्या सहाय्याने १५८ चेंडूत १३५ धावांची शतकी खेळी केली. ईश्वर चौधरी २ धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात ७५ धावांचे विजयी लक्ष्य गोव्याने केवळ १ गडी गमावत १८.२ षट्कांत सहज गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्याची सुरुवात खराब झाली. सलामीवीर आदित्य कौशिक आपले खाते खोलण्यापूर्वीच तंबूत परतला. इक्बाल अब्दुल्लाने त्याला आशिष थापाकरवी झेलबाद केले. परंतु त्यानंतर फलंदाजीस आलेल्या सुयश प्रभुदेसाईने सुमिरन आमोणकरच्या साथीत दुसर्या विकेटसाठी ५७ धावांची अविभक्त भागी करीत मोसमातील पहिल्याच रणजी सामन्यात गोव्याचा विजय साकरला. सुयशने ८ चौकारांनिशी ४७ चेंडूत नाबाद ४९ तर सुमिरन आमोणकरने नाबाद २० धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक ः सिक्किम, पहिला डाव ः सर्वबाद १३६, गोवा, पहिला डाव ः ६ बाद ४३६ घोषित, सिक्किम दुसरा डाव ः ८ बाद ३२१(इक्बाल अब्दुल्ला १३५, पाल्जोर तामंग ३६, ईश्वर चौधरी नाबाद २ धावा. अमित वर्मा २-४६ बळी), गोवा, दुसरा डाव ः १८.२ षट्कांत ७५, (सुमिरन आमोणकर नाबाद २०, आदित्य कौशिक ०, सुयश प्रभुदेसाई नाबाद ४९ धावा. इक्बाल अब्दुल्ला १-२३ बळी).