सिंधू, श्रीकांत, सायना दुसर्‍या फेरीत

0
92

सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू व किदांबी श्रीकांत यांनी आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत काल बुधवारी सकारात्मक सुरुवात केली. सायना व सिंधूने सरळ गेममध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याचा फडशा पाडला तर श्रीकांतला तीन गेमपर्यंत झुंजावे लागले.

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या सायनाने सिंगापूरच्या येव जिया मिन हिला २१-१२, २१-९ असे तर सिंधूने तैवानच्या पाय यू पो हिला २१-१४, २१-१९ असे हरविले. पुढील फेरीत माजी नंबर १ सायनाचा सामना चीनच्या गाओ फँगजी हिच्याशी होणार असून ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या व तिसर्‍या मानांकित सिंधूला चीनच्याच चेन झियाओझिन हिच्याशी लढावे लागणार आहे.

अव्वल मानांकित व राष्ट्रकुल स्पर्धेच्या रौप्यपदक विजेत्या श्रीकांतला मात्र संघर्ष करावा लागला. जपानच्या केंटो नशिमोतोविरुद्धचाय पहिला गेम १३-२१ असा गमावल्यानंतर पुढील दोन्ही गेम २१-१६, २१-१६ असे जिंकत त्याने विजयी सलामी दिली. या विजयासह त्याने हॉंगकॉंगच्या वॉंग विंग की व्हिन्सेंट याच्याशी गाठ पक्की केली. समीर वर्मा याला मात्र सातव्या मानांकित चोव टिएन चेन याच्याकडून २१-२३, १७-२१ असे पराजित व्हावे लागले.

पुरुष दुहेरीत अर्जुन एमआप व रामचंद्रन श्‍लोक व महिला दुहेरीत मेघना जक्कमपुडी व पूर्विशा राम यांनी दुसरी फेरी गाठली. या दोन्ही जोड्यांनी सनसनाटी निकालाची नोंद केली. अर्जुन- रामचंद्रन यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेल्या चुंग इयुई सियोक व किम डुकयोंग या कोरियाच्या जोडीला २५-२३, २३-२१ असा धक्का दिला. तर मेघना-पूर्विशाने चुरसपूर्ण लढतीत सिंगापूरच्या ओंग रेन ने व वोंग जिया यिंग क्रिस्टल यांना १४-२१, २२-२०, २१-१७ असे नमविले. मिश्र दुहेरीत सौरभ शर्मा व अनुष्का पारिख यांना १७-२१, १४-२१ असे पराभूत व्हावे लागले. कोरियाच्या किम वोन हो व शिन सियुंग चान यांनी भारतीय जोडीचा प्रतिकार मोडून काढला. वेंकट गौरव प्रसाद व जुही देवांगण यांना हॉंगकॉंगच्या ली चून हेई रेजिनाल्ड व चाव होई वाह यांच्याकडून ११-२१, १३-२१ असा पराभव स्वीकारावा लागल्याने स्पर्धेबाहेर व्हावे लागले.

अन्य भारतीयांचे निकाल ः साई प्रणिथ वि. वि. सुपान्यू अवहिंगसनन २१-१३, ११-२१, २१-१९, एच.एस. प्रणॉय वि. वि. कांताफोन वांगचारोएन २१-१५, १९-२१, २१-१९, रोहन कपूर व कुहू गर्ग पराभूत वि. झांग नान व ली यिनहुई १०-२१, १७-२१, अपर्णा बालन व के.पी. श्रुती पराभूत वि. हा ना बेक व यू रिम ली १०-२१, १०-२१, कुहू गर्ग व ब्लॉक निंगशी हझारिका पराभूत वि. सूंग फिये चो व टी जिंग यी १०-२१, १२-२१, मनू अत्री व सुमीत रेड्डी पराभूत वि. बोदिन इसारा व निपितफोन १४-२१, १६-२१