ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे प्रसिद्ध माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचे काल रविवारी निधन झाले. पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी बाल साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. वृत्त निवेदकाला अतिशय मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या दिग्गज्जांमध्ये अनंत भावे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. दूरदर्शनवरील बातम्या म्हणजे अनंत भावे असेच समीकरण होऊन गेले होते. धीर गंभीर आवाज, स्पष्ट शब्दोच्चार, चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणि ‘दाढी’ ही अनंत भावे यांची वैशिष्ट्ये होती.
अतिशय उत्तम आणि दर्जेदार वृत्तनिवेदक असलेले अनंत भावे हे सकस साहित्य लिहिणारे साहित्यिकही होते. स्तंभलेखक म्हणूनही ते नावाजले गेले. अनंत भावे यांनी अनेक बालवाङ्मय, बालकविता लिहिल्या आहेत.