- शंभू भाऊ बांदेकर
सावरकरांनी अस्पृश्यतेची दरी कमी करण्यासाठी आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी मंदिर प्रवेश आणि सहभोजनाचे कार्यक्रम ही दोन माध्यमे प्राधान्यक्रमाने निवडली. सन १९२५ च्या विठ्ठल मंदिरातील वार्षिक गणेशोत्सवात पारावर व्याख्यान देऊन त्यांनी या गोष्टीचा मोठा उहापोह केला व त्यानंतर ते दलित चळवळीचे अग्रणी ठरले. त्यांच्या या कार्याच्या निमित्ताने त्यांना शतशः अभिवादन!
स्वातंत्र्यवीर बॅ. विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याचे महत्त्व जाणून त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचे वचन भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणूक जाहिरनाम्यात दिले आणि एक प्रकारे वादाला तोंड फुटले. वास्तविक महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपा सत्तारुढ आहे. त्यांनी निवडणूक जाहिरनाम्यातून सावरकरांना मोठे करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, पण सावरकर महाराष्ट्रातले. मग महाराष्ट्रातून त्यांची पायाभरणी झाली पाहिजे, म्हणजे विरोधकांना चपराक बसेल, ही भूमिका त्यांनी घेतली असावी. तसे असेल तर मग ३७० कलम तुम्ही रद्द करूनच दाखवा, असा धमकीवजा इशाराही महाराष्ट्रातील निवडणुकीत कॉंग्रेसला दिला गेला. एकूण कुठल्याही पक्षाचे राजकारणी का असेनात, निवडणूक काळात आपला वरचष्मा कसा राहील या ईर्ष्येपोटी हे सारे घडत असते!
वास्तविक, भारतीय घटनेचे शिल्पकार व दीन-दलित, शोषित-पीडितांचे दीपस्तंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जसा ‘भारतरत्न’ फार पूर्वी मिळाला पाहिजे होता, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अद्वितिय कार्य पाहून त्यांनाही यापूर्वीच ‘भारतरत्न’ सन्मान प्राप्त झाला पाहिजे होता, पण दुर्दैवाने आज निवडणुकीसाठी त्यांचा वापर होतो आहे, हे योग्य वाटत नाही. त्यातही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जो भाजपा किंवा संघपरिवार सावरकरांचा उदो उदो करीत आहे, त्या सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ‘हरिजनांना मंदिरे खुली करा’ या म्हणण्याला बोटे मोडण्यात तथाकथित हिंदुत्ववादी मागे नव्हते. सावरकरांनी जेव्हा ‘गाय हा उपयुक्त पशू आहे’ असे विधान केले, रत्नागिरीत दलित चळवळीची मुहूर्तमेढ रोवताना हरिजनही आपल्यासारखेच माणूस आहेत, त्या माणसांना माणसांनी माणुसकीची वागणूक दिली पाहिजे, त्यांना इतरांसारखी मंदिरे खुली झाली पाहिजेत, असे सांगितले, तेव्हा त्यांच्या नावाने खडे फोडणारे लोकही काही कमी नव्हते. आता बदलत्या परिस्थितीत हे सारे बदलत आहे. शेवटी कालाय तस्मै नमः
महाराष्ट्रात विनायक दामोदर सावरकर, वासुदेव बळवंत, सेनापती बापट, गोखले, रानडे, लोकमान्य टिळक यांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या उत्कर्षासाठी जे अवर्णनीय काम केले आहे, ते दृष्टिआड करून कसे बरे चालेल? विषय सावरकरांचा आहे म्हणून मुद्दाम सांगावेसे वाटते की,‘किं घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने| लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने|’ असे म्हणणार्या ज्या सावरकरांना तब्बल अर्ध्या शतकाची कारावासाची शिक्षा झाली, अंदमानसारख्या अत्यंत दुर्गम भागात शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले, तेथे कडक एकांतवासामध्ये ठेवल्या गेलेल्या, दिवसभर कोलू पिसण्यासारखी अघोरी शिक्षा झालेल्या व हे सारे शांतपणे मनन, चिंतन करून शिक्षा भोगलेल्या क्रांतीवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ साठी आजही विरोध व्हावा, त्यांच्या दलित चळवळीबाबत टीकाटिप्पणी व्हावी ही आपली भारतीय संस्कृती नव्हे, हे कोणी सांगावे बरे?
सावरकरांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे योगदान ज्यांना माहीत आहे, त्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणात वाचून लोक भारलेले, भारावलेले आहेत. असे असले तरी रत्नागिरीतील त्यांच्या दलित चळवळीबद्दल फारच थोड्यांना माहीत आहे. यासंबंधी सांगायचे म्हणजे, ‘सशस्त्र क्रांतिकारकांचे मेरुमणी असलेले वीर सावरकर यांची सामाजिक क्रांतीसुद्धा तितक्याच सुवर्णाक्षरांनी लिहिण्याइतकी महत्त्वाची ठरते. भारत देशामध्ये चातुर्वर्ण्य समाजरचनेतील हजारो वर्षे प्रचलित असलेली जातिव्यवस्था ही हिंदू धर्माला पोखरून काढत आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. उच्चनीचतेच्या कल्पनेने समाजामध्ये दुजाभाव निर्माण होत आहे, हे माणुसकीचे लक्षण नव्हे, असे ते स्पष्टपणे सांगत. आपण राजकीय स्वातंत्र्यासाठीच भांडत आहोत, ते आपले पहिले कर्तव्य आहेच, पण त्याबरोबर फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळविणे म्हणजे देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले असे होत नाही तर राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्यसुद्धा असणे हे तितकेच महत्त्वाचे आहे, ही गोष्ट ते आपल्या अनुयायांना पटवून देत असत. हिंदू समाजातील एकताच स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी आधारभूत ठरणार आहे, यावर ते भर देत.
दोन जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट मिळाल्यानंतर तुरुंगातून सुटून मोकळ्या वातावरणात आल्यानंतर रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना १३ वर्षांच्या काळात सावरकरांना सामाजिक ऐक्यासाठीची दलित चळवळ राबविण्याची संधी मिळाली आणि ती त्यांनी अत्यंत निष्ठेने तडीस नेली. स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानबद्धतेत म्हणून दिनांक ८ जानेवारी १९२४ रोजी रत्नागिरीला आले. अर्थातच तो काळ म्हणजे स्पृश्य-अस्पृश्य असा भेदभाव मानणारा, सामाजिक विषमतेचा काळ होता. दलित अशा अस्पृश्य समाजाची उच्चवर्णीय स्पृश्य समाजावर सावलीसुद्धा पडू नये असा तो काळ. स्पर्शाने तर सोडाच, पण सावलीनेसुद्धा विटाळ होतो, असा मानणारा तो काळ. अशा भयानक काळात हिंदूंमधील स्पृश्य-अस्पृश्य ही तथाकथित भ्रामक कल्पना दूर करणे आणि सामाजिक विषमता नष्ट करणे ही बाब फार कठीण होती, पण सावरकरांनी मोठ्या शौर्याने आणि धैर्याने ते आव्हान स्वीकारले. त्यांनी रत्नागिरीत आल्यावर दलित वस्तीत जाऊन आणि सवर्णांचा रागरंग पाहून त्यांच्या घरात जाऊन त्यांना गोडीगुलाबीने समजावून हा जातिभेद नष्ट करण्याचा जाणीवपूर्वक कसोशीने प्रयत्न केला.
रत्नागिरीतील या दलित चळवळीसाठी सावरकरांनी रत्नागिरीतील अनेक विचारवंत लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्या कानी या कार्याची माहिती घातली. समता, स्वातंत्र्य व बंधुता या तीन तत्त्वांचा उपनिषदांतील आधार सोदाहरण सांगितला आणि या कार्यासाठी त्यांच्याकडून पाठबळ मिळविले. त्यांच्या वाणीने प्रभावीत होऊन शेकडो विचारवंत आणि कार्यकर्ते त्यांना येऊन मिळाले व माणसाने माणसाला माणसासारखे वागवले पाहिजे, यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असे सांगितले. रत्नागिरीतील एक सुपुत्र भक्तीभूषण दानशूर भागोजी शेठ कीर यांची साथ सावरकरांना फार मोलाची ठरली. सावरकरांनी अखिल हिंदू गणेशोत्सव, पतितपावन मंदिराची निर्मिती, सहभोजन, नाटके, मेळे, फुगड्या, स्त्रियांचे हळदीकुंकू, संक्रांतीत तिळगूळ वाटणे, दसर्याला सोने वाटणे अशा अनेक माध्यमांतून दलित चळवळीची ज्योत तब्बल १३ वर्षे तेवत ठेवली. या चळवळीचे औचित्य लक्षात घेऊन अर्थार्जन करण्याचे कार्य कीर शेटजींनी अखेरपर्यंत केले. ही सामाजिक चळवळ, सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी विधात्यानेच दानशूर भागोजी शेट कीरांशी आपली भेट घडवून आणली असे मनोमन मानून या कार्याचे श्रेय ते भागोजी शेटजींनाही देत असत. सावरकरांनी अस्पृश्यतेची दरी कमी करण्यासाठी आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी मंदिर प्रवेश आणि सहभोजनाचे कार्यक्रम ही दोन माध्यमे प्राधान्यक्रमाने निवडली. सन १९२५ च्या विठ्ठल मंदिरातील वार्षिक गणेशोत्सवात पारावर व्याख्यान देऊन त्यांनी या गोष्टीचा मोठा उहापोह केला व त्यानंतर ते दलित चळवळीचे अग्रणी ठरले. त्यांच्या या कार्याच्या निमित्ताने त्यांना शतशः अभिवादन!