सावधान! भस्मासुर फिरतोय…!!

0
14
  • ज. अ. रेडकर

दुष्ट बुद्धीचे लोक या तंत्रज्ञानाचा गैरवापर सद्या करीत आहेत आणि आपल्या विरोधकांना बदनाम करीत आहेत. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या ज्ञानाचा वापर केला जातो ही मोठी चिंतेची गोष्ट आहे.

पुराणांमधून देव आणि दानवांच्या कथांचा भरपूर भरणा आहे. त्यातीलच एक कथा आहे भस्मासुराची. भोलेनाथाची कठोर तपस्या केल्यावर भस्मासुराला एक वरदान मिळाले की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म होईल! भस्मासुर या वरदानाने एवढा बेभान झाला की तो ज्याच्या-त्याच्या डोक्यावर हात ठेवून भस्म करू लागला. तिन्ही लोक त्याच्या या आतताईपणाला घाबरून गेले. शेवटी भगवान विष्णूला मोहिनीचे रूप घेऊन या भस्मासुराला मोहित करावे लागले. तिच्याबरोबर नृत्य करता-करता त्याचा स्वतःचा हात त्याच्या डोक्यावर कधी गेला हे त्यालाच कळले नाही आणि तो मिळालेल्या वरदानानुसार भस्म झाला आणि तिन्ही लोकांवर आलेले संकट टळले.
आज नवीन भस्मासुराचा उदय झाला आहे आणि तो म्हणजे सोशल मीडिया! यावर कोणतीही माहिती उद्धृत केली की ती क्षणार्धात जगभर पसरते. त्यातून अनेक गैरसमज निर्माण होतात. अगा जे घडलेची नाही त्याचा प्रसार होतो आणि लोक त्यादृष्टीने विचार करायला लागतात. असत्य हेच लोकांना सत्य वाटायला लागते. नेते, अभिनेते आणि सामान्य व्यक्तींचीही यातून सुटका होत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून फोटो क्रॉप करून शीर एकाचे आणि धड दुसऱ्याचे करता येते, चेहऱ्यावरील भाव बदलता येतात. एखाद्याच्या तोंडी कोणतेही शब्द घालता येतात. भाषणाची मोडतोड करता येते. दुष्ट बुद्धीचे लोक या तंत्रज्ञानाचा गैरवापर सद्या करीत आहेत आणि आपल्या विरोधकांना बदनाम करीत आहेत. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या ज्ञानाचा वापर केला जातो ही मोठी चिंतेची गोष्ट आहे. अशा खोट्या प्रचारातून एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते.

एखाद्या तरुणाचे तरुणीशी असलेले प्रेमसंबंध बिघडले किंवा एखाद्या तरुणीवर एकतर्फी प्रेम जडले तर असा वैफल्यग्रस्त तरुण बदला घेण्यासाठी त्या तरुणीचे गलिच्छ फोटो सोशल मीडियावर टाकतो आणि तिला बदनाम करतो किंवा सोशल मीडियाची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करतो, पैसाही उकळतो. अब्रू जाण्याच्या भीतीने या तरुणी हा सगळा अत्याचार सहन करीत असतात, तर काही तरुणी आत्महत्या करून या त्रासातून आपली सुटका करून घेतात. सामाजिक जीवन अशा प्रकारे गढूळ करण्याचे काम हा आधुनिक भस्मासुर करीत आहे.
राजकारणातील व्यक्तीला बदनाम करून आपले स्थान बळकट करण्यासाठी या भस्मासुराचा जबरदस्त उपयोग अलीकडच्या काळात होऊ लागला आहे. नेत्याचे चारित्र्य हनन केले की त्याची समाजातील प्रतिमा काळवंडते आणि लोकमत बदलते. या गोष्टी हलक्यात घेतल्या किंवा त्याचा वेळीच प्रतिवाद करून सत्य लोकांसमोर आणले नाही तर त्या व्यक्तीचे राजकीय भवितव्य धोक्यात येते. म्हणूनच राजकीय लोकांनी जागरूक राहणे आणि वेळीच उपाययोजना करणे योग्य ठरेल. वेळ दवडला तर सगळेच संपले समजावे!
कोणे एकेकाळी नेत्याची प्रतिमा त्याच्या सामाजिक कार्यातून तयार व्हायची. आता जाहिरातबाजीतून होते. आपल्या हातून जनतेची कामे होवोत अथवा न होवोत पण शुल्लक कामाची जाहिरात जोरदार व्हायला पाहिजे. लोकांना खरे-खोटे तपासायला कुठे वेळ असतो! या जाहिरातबाजीतून जी प्रतिमा तयार होते तीच लोकांच्या मनावर बिंबते आणि त्या व्यक्तीचा राजमार्ग सुरळीतपणे पार पडतो. असं म्हणतात की सत्य समोर येईपर्यंत असत्य सगळी दुनिया फिरून आलेले असते. मात्र असत्याच्या पायावर आधारित असलेला डोलारा फार काळ टिकत नाही. कारण सत्याचा तडाखा उशिराने का होईना पण जोरदार बसतो. लोकांना एकदा उल्लू बनवता येईल, दोनदा बनवता येईल, सदासर्वदा उल्लू नाही बनवता येणार.

आपल्या देशात अर्धशिक्षित लोकांची संख्या जास्त आहे. या लोकांच्या मनावर सोशल मीडियाने कब्जा केला आहे. ज्ञानवृद्धी करणारी पुस्तके, मासिके ही मंडळी वाचीत नाहीत. व्हॉट्स ॲप, यू-ट्युब, इन्स्टाग्राम यांवर जे येईल/दिसेल त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता त्यांच्यापाशी नसते. अशी तरुण मुले एखाद्या पत्रकाराच्या माईकसमोर राजकीय विषयावर जेव्हा आपली प्रतिक्रिया देतात तेव्हा त्यांचे ज्ञान किती तोकडे आहे, इतिहास, भूगोल, विज्ञान याबद्दल ज्ञान किती मर्यादित आहे आणि कोणत्या निकषावर बेतलेले आहे हे स्पष्ट कळून येते. दुसरा सुशिक्षित माणूस कितीही ओरडून त्याची चूक दाखवीत असला किंवा प्रतिवाद करीत असला तरी ती गोष्ट मानायला अशी मंडळी तयार होत नसते. चुकीच्या गृहीतकावर लोकमत तयार झाले आणि चुकीच्या व्यक्तीच्या हाती देशाचा कारभार सोपविला गेला तर त्या देशाच्या ऱ्हासाला सुरुवात होते. देशात अशिक्षित आणि अर्धशिक्षित लोकांचे प्राबल्य असल्याचा हा परिणाम असतो. याचे परिणाम कालांतराने संपूर्ण देशाला भोगावे लागतात. म्हणून या आधुनिक भस्मासुरापासून आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे होऊन बसले आहे. यावर एकच उपाय आणि तो म्हणजे समाजातील सर्व घटकांना उत्तम शिक्षण देऊन त्यांच्यात तर्कशुद्ध विचार रुजवणे हा होय!