>> बहुमतामुळे सत्ताधारी गट निश्चिंत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज अर्थसंकल्पही मांडणार
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवार दि. ३० मार्च रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सभागृहात सकाळी विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत, तर दुपारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. त्यानंतर तीन महिन्यांसाठी लेखाअनुदानाला मान्यता घेतली होईल. हा अर्थसंकल्प नंतर पावसाळी अधिवेशनात चर्चा करून मंजूर केला जाईल. तसेच बुधवारी उपसभापतिपदासाठी देखील निवडणूक घेतली जाणार आहे.
गोवा विधानसभेच्या दोन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनास मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर बुधवारी ते सकाळच्या सत्रात सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत, तर दुपारच्या सत्रात वार्षिक अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला एकूण २५ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे सत्ताधारी गट विश्वासदर्शक ठरावाबाबत पूर्णपणे निश्चिंत आहे. भाजपचे २०, मगोचे २ आणि ३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा लाभल्याने सरकार हा विश्वासदर्शक ठराव आरामात पार करेल, हे निश्चित आहे.
या अधिवेशनात सभागृहात आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर अर्थसंकल्प २०२१-२२ च्या भाषणाचा कृती अहवाल सादर केला जाणार आहे.
यावेळी राजकीय, सामाजिक, कला व इतर विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसेच पद्मभूषण पुरस्कार प्राप्त माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर, ब्रह्मेशानंद स्वामी, ब्रम्हांनद शंखवाळकर, विनायक खेडेकर, साहित्यिक दामोदर मावजो, व्यंकटेश धेंपो, विराज मराठे यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडला जाणार आहे.
लेखाअनुदानाला मान्यता घेणार
मुख्यमंत्री दुपारी ३ वाजता राज्याचा वर्ष २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात स्वयंपूर्ण गोवा २.० मोहिमेवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. रोजगार निर्मिती, महसूल निर्मिती, खाण, पर्यटन विकासावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात लेखाअनुदान मांडून त्याला मान्यता घेतली जाणार आहे. त्यानंतर या अर्थसंकल्पावर पावसाळी अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे. डॉ. सावंत यांनी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर खाते प्रमुखांची बैठक काल घेतली.
उपसभापतिपदासाठी तिघांचे अर्ज
गोवा विधानसभेच्या उपसभापतिपदासाठी तीन जणांनी अर्ज सादर केले आहेत. सत्ताधारी भाजपतर्फे सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई आणि कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी अर्ज दाखल केले आहेत, तर कॉंग्रेसतर्फे साळगावचे आमदार केदार नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे. सत्ताधारी भाजपतर्फे दोघांनी उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केल्याने राजकीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.