‘आरजी’चा आक्षेप; कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यातील उद्योगांत स्थानिकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे राज्यातील उद्योगामध्ये परप्रांतीयांना रोजगार देणे चुकीचे आहे. सावंतवाडी येथील रोजगार मेळाव्यात गोव्यातील 30 उद्योगांनी सहभाग घेतला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या उद्योगांना कारणे दाखला नोटीस बजावावी, अशी मागणी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी पक्ष कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल केली.
सावंतवाडी येथे भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात गोव्यातील 30 उद्योगांनी सहभाग घेतला. भाजयुमो आपल्या राज्यात रोजगार मिळावे भरवते, त्याला आमचा आक्षेप नाही; मात्र या मेळाव्यात गोव्यातील 30 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तिथे त्यांनी बी. फार्म, डी. फार्म, आयटीआय, डिप्लोमा, ऑटोमोबाईल अभियंते अशा विविध जागांसाठी जाहिरात केली. राज्यात अशी शैक्षणिक पात्रता असणारे अनेक युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत; मात्र त्यांना संधी देण्याऐवजी महाराष्ट्रातील युवकांना संधी देणे चुकीचे आहे. स्थानिक युवकांवर अन्याय केला जात आहे, असा आरोप परब यांनी केला. गोव्यातील उद्योग राज्य सरकारकडून अनुदान घेतात. सरकारी साधनसुविधा वापरतात. त्यांनी स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देणे गरजेचे आहे, असेही परब म्हणाले.