>> सुरावली ते बाणावलीपर्यंत नदीपात्र बनले हिरवेगार; प्रदूषणही वाढले
एकेकाळी देश-विदेशात व्यापारासाठी प्रमुख जलमार्ग असलेली दक्षिण गोव्यातील साळ नदी प्रदूषित होत चालली असून, आता जलपर्णींचा विळखाही वाढत चालला आहे. जलपर्णी वाढत चालल्याने सुरावलीपासून ते बाणावलीपर्यंतचे जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील नदीपात्र हिरवेगार बनले आहे. नदीतील जलपर्णी हटवावी, तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचललण्याची मागणी होत आहे.
सासष्टीतील साळ नदीचा उगम वेर्णा पठारावरून होतो आणि नंतर ती बेतुलपर्यंत प्रवाहित होते. नदीचा उगम वेर्णा पठारावर झालेला असून, ती पुढे नुवे, सुरावली, मुंगूल, खारेबांध, बाणावली, बेतुलपर्यंत 35 किलोमीटर अंतरावर जाऊन अरबी समुद्राला मिळते. ही नुवे,बाणावली, फातोर्डा, मडगाव, नावेली, वेळ्ळी मतदारसंघातून वाहते. बरीच वर्षे गाळ उपसा न झाल्याने आणि जनावरांची हाडे, कचरा, टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात टाकल्या नदीत टाकल्या जात असल्याने पात्र उथळ बनले आहे. तसेच सांडपाणी देखील सोडले जात असल्याने नदीच्या पाण्याला दुर्गंधी देखील येत आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय पाणी प्रदूषित झाल्याने ते शेती-बागायतीसाठी वापरणे धोक्याचे बनले आहे.
ह्या समस्या एका बाजूला असताना आता साळ नदीत जलपर्णींची मोठ्या प्रमाणात वाढत होताना दिसत आहे. सुरावली ते बाणावलीपर्यंतचे नदीपात्र पूर्णपणे हिरव्यागार जलपर्णींनी भरून गेले आहे. त्यामुळे ती नदी की हिरवा गालिचा असा प्रश्न अनोळखी लोकांना पडू लागला आहे.
यापूर्वी जलस्रोत खात्याने गाळ उपसा करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते; मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. आता साळ नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी विशेष पावले उचलण्याची गरज आहे.