साळावली, म्हैसाळ धरणाची उंची वाढवण्याचा विचार

0
13

>> जलस्रोतमंत्र्यांची माहिती; उंची वाढवल्यास साळावलीत 35 टक्के जलसाठा वाढणार

राज्यातील आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन दक्षिण गोव्यातील
प्रमुख साळावली धरण, म्हैसाळ धरण या दोन धरणांची उंची वाढविण्यावर विचारविनिमय केला जात आहे. साळावली धरणाची उंची वाढविल्यास आणखी 35 टक्के पाण्याचा साठा वाढू शकतो. पंचवाडी येथील म्हैसाळ धरणाची उंची वाढविल्यास पाण्याचा साठा वाढणार आहे. तसेच, मिराबाग सावर्डे ते पंचवाडी येथील म्हैसाळ धरणापर्यंत पाणी खेचण्यासाठी खास योजना तयार केली जाणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी विधानसभेत जलस्रोत, सहकार खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.

राज्यातील साळावली, अंजुणे ही धरणे भरल्यानंतर वाहून जाणारे पाणी अडविण्याचा विचार केला जात आहे. साळ येथील प्रकल्पातून अतिरिक्त 250 एमएलडी पाणी मिळणार आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेखाली राज्यातील 162 जलस्रोतांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 370 बंधारे असून, येत्या डिसेंबर 2024 पर्यंत अतिरिक्त 100 बंधाऱ्याची भर घातली जाणार आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.

सहकार खात्याकडून सहकारी संस्थांच्या कारभारात शिस्त आणण्यावर भर देण्यात येत आहे. गैरकारभारात गुंतलेल्या चाळीस जणांवर कारवाई करून त्यांना सहकार संस्थांच्या कामकाजात सहभागी होण्यास अपात्र ठरविले आहे. गोवा डेअरीच्या कारभारात सुसूत्रता आणण्याकडे लक्ष देण्यात आले आहे, असेही ते
म्हणाले.

डिसेंबरपर्यंत तीन धरणांचे काम सुरू : शिरोडकर
येत्या डिसेंबर अखेरपर्यंत काजूमळ, तातोडी, माणके येथील धरणाच्या कामाचा शुभारंभ केला जाणार आहे. राज्यातील जलप्रक्रिया प्रकल्पांना कच्चे पाणी कमी पडू दिले जाणार नाही. जलस्रोत खात्याचे प्रमुख आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान अभियंता यांची बैठक घेऊन पाण्याबाबत नियोजन केले जाणार आहे, असेही सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.