>> एकास अटक; साळगावात तणावाचे वातावरण
साळगाव चर्चचे धर्मगुरू मॅथ्यू रॉड्रिग्स यांना काल एका ६६ वर्षीय इसमाने मारहाण केली, तसेच अपशब्द वापरले. या मारहाण प्रकरणानंतर लोकांनी साळगाव पोलीस स्थानकावर धाव घेत संशयितास अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर साळगाव पोलिसांनी या प्रकरणी जोसेफ डिसोझा (रा. साळगाव) यास अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पावणे एकच्या दरम्यान हा मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेमुळे साळगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंत्री मायकल लोबो आणि आमदार जयेश साळगावकर यांनी पोलीस स्थानकावर दाखल होत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला.
माय दे देऊस या चर्चच्या सुशोभिकरणाचे काम आणि रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. संशयित जोसेफ डिसोझा या कामास वेळोवेळी हरकत घेत होता. सोमवारी दुपारी संशयिताने शेतजमिनीत माती टाकल्यावरून आणि नाला अडविल्याच्या कारणावरून धर्मगुरू मॅथ्यू रॉड्रिग्स यांच्याशी वाद घातला. तसेच त्यांना अपशब्द वापरत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार समजताच पंचायत मंडळ आणि नागरिकांनी साळगाव पोलीस स्थानकावर धाव घेतली व संशयिताला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांनी अटक केली.