साळगावकरची वेळसाववर मात

0
115

साळगावकर फुटबॉल क्लबने काल बुधवारी झालेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतीत वेळसाव स्पोटर्‌‌स अँड कल्चरल क्लबला २-० असे सहज हरविले. नागवा मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. देवेंद्र मुरगावकर व स्टीफन सतरकर यांनी सामन्याच्या दुसर्‍या सत्रात ‘ग्रीन ब्रिगेड’कडून गोल केले.

पहिल्या ४५ मिनिटांत वेळसाव संघाने चेंडूवर अधिक वेळ ताबा राखला. चांगल्या चाली रचत या सत्रात त्यांनी संधीदेखील निर्माण केल्या. परंतु, फिनिशिंग टच देण्यात त्यांचा संघ कमी पडला. या सत्रात साळगावकरच्या देवेंद्रने गोलजाळीचा वेधदेखील घेतला होता. परंतु, रेफ्रींनी ऑफ साईडचे कारण देत हा गोल नाकारला. याच सत्रात साऽगावकरच्या अँड्र्यू याचा फटका वेळसावचा गोलरक्षक प्रेस्ली मास्कारेन्हस याने अडविला. दुसर्‍या सत्रातही वेळसावने चांगला खेळ दाखवला. पण, साळगावकरने पहिल्या सत्रातील चुका टाळत वेळसावच्या आक्रमणाला प्रतिआक्रमणाने उत्तर दिले. सेल्विन मिरांडा याच्या पासवर ६६व्या मिनिटाला देवेंद्रने गोलकोंडी फोडताना पहिला गोल केला. वेळसावला यानंतर बरोबरीची संधी होती. परंतु, बरसाल व्हिएगस याच्या क्रॉसवर शुभम राव व लायवांग यांना हेडर लगावता आला नाही. चैतनच्या पासवर स्टीफनने साळगावकरचा दुसरा गोल केला.