सालेलीत युवकाचा खून ; आमोण्यात शीरविरहीत मृतदेह

0
72

वाळपई (न. प्र.)
सालेली सत्तरी येथे तीन जणांच्या भांडणांत श्याम बारकेलो गावकर (वय २८ राहणारा सालेली सत्तरी) याचा खून झाला. वाळपई पोलिसांनी एकूण प्रकारासंदर्भातील चौकशीनंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबतची माहिती अशी की सालेली सत्तरी येथील महमद शफी यांच्या घरामध्ये श्याम गावकर महंमद शफी व राजेश नाईक हे तिघेजण दारू पिण्यासाठी बसले होते. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून बाचाबाची सुरू झाली व परस्परांना मारहाण करण्यात आली. याचवेळी राजेश नाईक व मोहम्मद शफी या दोघांनीही शाम गावकर यांना जबर मारहाण केली व दोघांपैकी एकाने त्याच्या डोक्यावर कुदळीचे घाव घातल्याने तो जबर जखमी झाला. सदर घटना काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची माहिती १०८ रूग्णसेवेला देण्यात आल्यानंतर शाम गावकर याला जखमी अवस्थेत वाळपईच्या सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.
याबाबतची माहिती वाळपई पोलिस ठाण्याला मिळताच पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणासंदर्भात पुढील चौकशी करताना पोलिस अधिकार्‍यांनी राजेश नाईक व महंमद शफी याना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील चौकशी सुरू होती. शाम गावकर यांचा मृतदेह वाळपईच्या शवागृहात ठेवण्यात आला असून त्याच्यावर रविवारी सकाळी उत्तरीय तपासणी घेण्यात येणार असल्याचे वायंगणकर यांनी सांगितले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. महमद शफी यांची पत्नी व मुले घरात नसल्याने घरात दारु पिण्याचा बेत आखला होता. अति दारु प्राशन केल्याने भांडण सुरु होउन त्यातून खुनाचा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीवरुन तिघेही नेहमी दारु पिण्यासाठी बसत व भांडत असत व सकाळी परत एकत्र होत.
आमोण्यातील युवकाचा
मृतदेह नदीत सापडला
डिचोली (न. प्र.)
सावंतवाडा-आमोणा येथील रंजेश लोलो सावंत (वय ३६) या युवकाचा शीर नसलेला मृतदेह काल आमोणा-खांडोळा पुलाजवळ नदीत तरंगताना आढळल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
टीव्ही केबल दुरुस्तीकाम करणारा रंजेश सावंत हा गुरुवारपासून बेपत्ता होता. काल शीर नसलेल्या स्थितीतील त्याचा मृतदेह आमोणा पुलाजवळ नदीत दिसून आल्याने त्याचा खून झाला आहे की काय याबाबत डिचोली पोलीस तपास करीत आहेत.
सदर मृतदेह शिरविरहीत असून याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच निश्‍चित कारण समजू शकले नसून सदर मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालाची रासायनिक व इतर बाबतीत तपासणी केल्यानंतर याबाबत अधिक माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक संजय दळवी यांनी दिली.
डिचोली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अविवाहीत युवक हा ११ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याच शोध घेण्याचा प्रयत्न केला. १२ रोजी याबाबत डिचोली पोलीसांत तक्रार नोंदवण्यात आली. डिचोली पोलीसांनी शोधाशोध केली असता काल आमोणा नदीत त्याचा शिरविरहीत मृतदेह तरंगताना आढळला.
पो. निरीक्षक संजय दळवी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेतनाच्या सविस्तर अहवाल उद्यापर्यंत हाती आल्यानंतर या प्रकरणी मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकेल असे पोलीसांनी सांगितले.
साखळीचे आमदार प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी उपस्थिती लावून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.