सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना काँग्रेसकडून घेराव

0
10

>> महत्वाच्या सरकारी इमारतींकडे दुर्लक्षाबद्दल विचारला जाब

सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यातील सरकारी खात्यांची कार्यालये असलेल्या इमारती तसेच अन्य वारस, इस्पितळ व अन्य काही महत्वाच्या इमारतींच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचा प्रश्नावरून काल विरोधी काँग्रेस पक्षाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ सर्व इमारतींचे दुरुस्ती व स्ट्रक्चरल व सेफ्टी ऑडिट तयार करण्याची सूचना केली.

नुकतेच पणजीतील समाज कल्याण खात्याच्या कार्यालयातील सिलिंग कोसळण्याची जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, ॲड. श्रीनिवास खलप, विशाल वळवईकर, विवेक डिसिल्वा, राजन घाटे, आदी काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांना 2019 मध्ये जीर्ण म्हणून घोषित केलेल्या आणि सुरक्षा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास तसेच या इमारतींचे दुरुस्तीकाम हाती घेण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याला अपयश आल्याबद्दल धारेवर धरले.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री नीलेश काब्राल यांनी 2023 साली गोवा विधानसभेत दिलेल्या उत्तरातून मडगाव येथील माथानी साल्ढाणा प्रशासकीय इमारत, मडगाव येथील रवींद्र भवन, पणजी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची जुनी इमारत, मॅकेनिज पॅलेस, कांपाल येथील बालभवनची जोड इमारत, जुन्ता हाऊस पणजी, विविध ठिकाणच्या सरकारी प्राथमिक शाळा इमारती, मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळाची जुनी इमारत आणि मडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, रायबंदर येथील जुनी जीएससी इमारत, गोवा लोकायुक्त कार्यालय या इमारती जीर्ण असल्याचे स्पष्ट केले होते. या इमारतींची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याने अजून का हाती घेतली नाही असा प्रश्न यावेळी काँग्रेस नेत्यांनी पार्सेकर यांना केला.