सार्वजनिक गणेशोत्सव :  चित्र बदलायला हवे!

0
216

– अजित पैंगीणकर
गोव्यात मुक्तीनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन झाली. पणजी – म्हापसा – मडगावसारख्या शहरांत केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पूर्वी होती, परंतु अवघ्या पन्नास वर्षांत या मंडळाची संख्या झपाट्याने वाढत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्या उद्देशाने या उत्सवाची सुरुवात केली, तो उद्देश आज सफल होत आहे का? उलट एखाद्या मंडळामध्ये धुसफुस झाली की लगेच दुसर्‍या वर्षी नवीन मंडळाची स्थापना तरी होते किंवा पूर्वीच्या मंडळाला गळती लागते असेही प्रकार घडू लागले आहेत.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. गोव्यात प्रत्येकाच्या घरी दीड ते नऊ दिवसांचा गणपती असतो आणि या उत्सवाची तयारी १५-२० दिवस आधीपासून सुरू होते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परिस्थितीनुसार उत्सव साजरा करीत असते. मात्र सार्वजनिक उत्सवात अवाढव्य खर्च केला जात आहे. गोव्यातील पणजी, म्हापसा, मडगाव, सांगे, वास्को या शहरांतील सार्वजनिक गणेशोत्सवांना भक्कम पाया होता. आजही या मंडळांकडे लोक विश्‍वासाने आणि आदराने पाहतात. लोकांकडून देणगी कूपनांच्या रूपाने गोळा केलेली रक्कम लोकांसाठी खर्च करताना केवळ करमणुकीपुरतेच लक्ष न देता लोकाभिमुख कामांकडेही लक्ष देण्याचा या मंडळाचा कल आजही असल्याचे दिसत आहे. मात्र काही मंडळांमध्ये स्पर्धा चालू आहे. भव्य आणि आकर्षक बक्षिसे देणगी कूपनवर ठेवली जात आहेत. काही मंडळे विश्‍वासार्हतेला पात्र ठरत असताना काही ठिकाणी देणगी कूपनांचे निकाल जाहीर केले जात नाहीत किंवा देणगी कूपनांवर दाखविलेल्या वस्तूही आणल्या जात नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात.
आपला देश गुलामगिरीत होता. सरकारवर टीका करण्याची किंवा मते व्यक्त करण्याची सोय नव्हती. सारा समाज गुलामगिरीच्या वरवंट्याखाली चिरडला जात होता. असह्य त्रास सहन करावे लागत असताना सुद्धा लोक मूग गिळून गप्प बसले होते. अशा वेळी संपूर्णपणे विभागल्या गेलेल्या समाजाला आणि अन्यायाखाली दडपल्या गेलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मोठ्या हुशारीने खासगी गणेश पूजनाला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप दिले. या निमित्ताने लोकांना एकत्र यायला मिळावे, लोक एकमेकांना भेटावेत. त्यांच्यात विचारांची आणि अनुभवांची देवाणघेवाण व्हावी आणि या विचारमंथनातून देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात करायला मिळेल या उद्देशाने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.
सुरुवातीला पुणे-मुंबईपुरता असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे लोण महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता गोव्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहे. पुढे ज्या उद्देशाने लो. टिळकांनी खासगी गणेश पूजेला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप दिले तो उद्देश पूर्ण झाल्याचा अनुभव प्रत्येक भारतीयाने घेतला. लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पुरेपूर लाभ घेतला आणि त्यातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणारे अनेक क्रांतिकारक तयार झाले. ब्रिटिश सरकारविरुद्ध असंतोषाची आग जनमानसात तेवत राहिली पाहिजे याची काळजी लोकमान्यांनी घेतली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६७ वर्षांचाच विचार केल्यास सार्वजनिक गणेशोत्सवात आमूलाग्र बदल झालेला आहे. कानठळ्या बसणारे ध्वनिक्षेपक, अवाढव्य मूर्ती, करमणुकीवर मोठ्या प्रमाणात करण्यात येणारा खर्च, विसर्जनाच्या वेळी होणारा गोंधळ, यामुळे सार्वजनिक उत्सवांचा दर्जा खालावत चालला असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते.
गोवा मुक्त होईपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव हा प्रकार तसा गोव्यात नव्हता. पोर्तुगिजांच्या क्रूर दडपशाहीमुळे घरोघरी गणपती पुजणेदेखील धोक्याचे होते. गोवा मुक्तीनंतर मात्र घरोघरी गणपती पुजायला गोव्यात सुरुवात झाली आणि पुढे पुणे-मुंबईच्या धर्तीवर आपल्याकडेही सार्वजनिक उत्सव असावेत या विचाराने तरुण पिढी पुढे आली. सुरुवातीला मोठ्या शहरांत होणारा उत्सव आता खेडोपाड्यांत सार्वजनिक उत्सव सुरू व्हायला लागला आहे. सुरुवातीला या उत्सवात सादर होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांना एक दर्जा असायचा. सांस्कृतिक ठेवा ज्याला म्हणतात तो दिसायचा. हल्लीच्या उत्सवात तो अभावानेच दिसतो. काही जणांना सांस्कृतिक दर्जा टिकवून ठेवावे असे वाटते आणि जाणीवपूर्वक प्रयत्नही केले जातात, परंतु हवी तेवढी साथ मिळत नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते.
गोव्यातील उत्सव हा पूर्णपणे लोकांनी दिलेल्या देणग्या किंवा देणगी कूपनवर आधारित असतो. अशा वेळी या देणगीद्वारे गोळा केलेल्या निधीचा विनियोग योग्य तर्‍हेने व्हायला हवा. अवास्तव असा खर्च टाळणे शक्य आहे. भव्य देखावे, विजेची रोषणाई असायला हरकत नाही, परंतु हात राखून खर्च करणे शक्य आहे. या उत्सवाच्या वेळी सादर करणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांतून हीन संस्कृती आणि विकृतीचे दर्शन होणार नाही ना याकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवायला हवे. या निधीतून सामाजिक प्रकल्प उभारणे, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत देणे, असे उपक्रम व्हायला हवेत. समाज कार्यकर्त्यांची दखल घेतानाच समाजप्रबोधनाचे कार्यक्रम अधिकाधिक व्हायला हवेत. सार्वजनिक मंडळे ही अमुक एका गटाचीच न राहता खर्‍या अर्थाने सार्वजनिक हिताचा विचार या ठिकाणी व्हायला हवा. गोव्यात आज अनेक समस्या भेडसावायला लागल्या आहेत. युवा पिढी अमली पदार्थांच्या मागे लागली आहे. बेकारांची संख्या वाढत आहे. वैफल्यग्रस्त स्थितीत वावरणारे युवक-युवती आत्महत्या करण्याकडे धावत आहेत. मटका-जुगारासारख्या व्यसनांमागे लागले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवात समाजप्रबोधनाचे काम करताना नव्या पिढीला बरोबर घेऊन जावे लागेल. गणेश विसर्जनाच्या वेळी देखील अवास्तव खर्च टाळणे शक्य आहे. विनाकारण दारूकामाच्या आतषबाजीवर खर्च करून लोकांकडून जमविलेल्या निधीची राखरांगोळी करण्याच्या बाबतीत हात आखडता घ्यायला हवा. मिरवणुकीच्या वेळी काही ठिकाणी दारुड्यांचे नृत्य करण्याचे प्रकार घडतात त्यातून उत्सवाचे औचित्य आणि पावित्र्य बिघडत असते. हमरस्त्यावरून मिरवणूक जाताना इतर वाहने खोळंबणार नाहीत ना याची जशी दक्षता घ्यायला हवी, त्याचप्रमाणे अन्य धर्मीयांनादेखील मानाने वागवायला हवे. गणेशोत्सवात साजरे होणारे कार्यक्रम पाहण्याची आज लोकांची तयारी नसते. ते चित्र बदलायला हवे. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाचे चित्र बदलत असते. बिघडत असते. काही ठिकाणी त्याला बीभत्स स्वरूप येत असते. त्यात बदल व्हायला हवा. ज्या उद्देशाने लो. टिळकांनी या उत्सवाची सुरुवात केली, त्यांची पूर्तता करताना उत्सवाचे बदललेले स्वरूप परत पूर्वपदावर आणायला हवे.