सार्दिन उवाच

0
34

समस्त भाजप विरोधकांच्या एकत्रीकरणाबाबतचा कॉंग्रेसचा घोळात घोळ का संपता संपत नाही त्याचे एक कारण दक्षिण गोव्याचे कॉंग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओतून जनतेसमोर आले आहे. कॉंग्रेसची सर्वांत मोठी समस्या हीच आहे की समविचारी पक्षांशी युती करून भाजपचा पाडाव करण्याचे लक्ष्य ठेवण्याऐवजी केवळ स्वतःचे सवते सुभे सांभाळण्यालाच सर्व नेत्यांचे प्राधान्य आहे. पक्षाचे काय व्हायचे ते होवो, पण आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येता कामा नये हाच स्वार्थी विचार ह्या कॉंग्रेसजनांच्या मनात असल्यानेच पक्षहितार्थ निर्णय घेण्यात ही मंडळी वेळोवेळी खोडा घालीत आली आहेत. फ्रान्सिस सार्दिन यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि जे त्यांच्या मनात होते, ते जनात आले एवढेच.
सार्दिन हे केवळ कॉंग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या कॉंग्रेसच्या निवडणूक समितीचे ते एक प्रमुख सदस्यही आहेत. जुनेजाणते अनुभवी नेते तर ते आहेतच. परंतु आपल्या प्रदेशाध्यक्षाला आणि निवडणूक समितीच्या अध्यक्षालाच सरळसरळ ‘चोर’ संबोधून ते मोकळे झाले. बरे, प्रदेशाध्यक्षांविरुद्धचा आपला आकस व्यक्त करूनच ते थांबले नाहीत. आपल्या समर्थक एथेल लोबो यांना पक्षाची फातोर्ड्यातील उमेदवारी मिळणार नसेल, तर त्यांनी आणि त्यांच्यासोबत फातोर्ड्यातील सर्व कॉंग्रेसजनांनी सामूहिकरीत्या पक्षत्याग करून तृणमूल कॉंग्रेसमध्ये जावे असा जाहीर संदेश देताना ते कॅमेर्‍यावर चित्रबद्ध झाले आहेत. फातोर्डा हा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांचा बालेकिल्ला. आपला हा बालेकिल्ला राखून ठेवण्यासाठी मतविभाजन होऊ नये म्हणून सरदेसाई सातत्याने कॉंग्रेस आणि इतर पक्षांचा पाठिंबा आपल्या पक्षाला मिळवण्यासाठी धडपडत आहेत. कॉंग्रेसने त्यांना आधी भरघोस आश्वासन दिले. मग ते थंड्या बस्त्यात टाकले. त्यामुळे विजय आपल्या शिलेदारांसह ममता बॅनर्जींच्या भेटीस गेले. आता पुन्हा एकदा कॉंग्रेसला गोवा फॉरवर्डशी चर्चा करण्याची हुक्की आली आहे आणि युतीसंदर्भातील बोलणी चालली आहेत. परंतु अशा प्रकारे कॉंग्रेसची गोवा फॉरवर्ड वा इतर पक्षांशी युती झालेली बर्‍याच कॉंग्रेसजनांना नकोच आहे. याचे कारण काय, तर केवळ आपल्या प्रभावाखालील मतदारसंघातील आपले राजकीय वजन कमी होऊ नये हेच! यदाकदाचित युती झाली आणि आपल्या प्रभावाखालील मतदारसंघ दुसर्‍या पक्षाला सोडावा लागला तर आपले राजकीय वर्चस्व धोक्यात येईल ही भीतीच या प्रस्तावित युतीमध्ये खोडा घालण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. हे केवळ सार्दिन यांच्याच बाबतीत आहे असे मानण्याचे काही कारण नाही. कॉंग्रेसच्या बहुतेक नेतेमंडळींची हीच भावना आहे. फक्त सार्दिन यांनी ती अनवधानाने कॅमेर्‍यापुढे ती शिवराळपणे व्यक्त केली एवढेच.
सार्दिन यांचा एकंदर आवेश, प्रदेशाध्यक्षांना त्यांनी सरळसरळ ‘चोर’ संबोधणे आणि पक्ष कार्यकर्त्यांना सामूहिकरीत्या पक्षत्याग करण्यास चिथावणे, ते करतानाची त्यांची शिवराळ भाषा हे सगळे पाहिले तर ज्या पक्षाने आपल्याला खासदारकी बहाल केली आणि आपले जवळजवळ संपलेले राजकीय अस्तित्व पुनरूज्जीवित केले, त्या पक्षाच्या हितापेक्षा केवळ स्वहित त्यांच्यासाठी मोठे असल्याचेच सिद्ध होते.
आपल्या तोंडून ऐकवली जाणारी विधाने आपलीच आहेत ही कबुलीही सार्दिन यांनी आता दिलेली आहे. मात्र, ती आपलीच विधाने आहेत, पण ‘अनौपचारिक’ आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार अजबच म्हणायला हवा. ‘औपचारिक’ बोलण्यात पक्षहिताच्या, एकजुटीच्या बाता मारायच्या आणि ‘अनौपचारिक’ बोलण्यात मात्र पक्षाची सामूहिकरीत्या ‘मारायची’ असा संदेश कार्यकर्त्यांना द्यायचा हा काय प्रकार आहे बरे? सार्दिन यांच्या पडत्या फळाची आज्ञा घेऊन एथेल लोबो ताबडतोब पक्षत्याग करून तृणमूल कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्या आहेत. म्हणजे फातोर्ड्यात तृणमूल कॉंग्रेस त्यांना उमेदवारी देणार आहे. विजय सरदेसाई यांच्या विरोधात त्या तेथे लढणार आहेत. जर कॉंग्रेस – गोवा फॉरवर्ड युती होणार असेल तर विजय हे युतीचे अधिकृत उमेदवार असतील. म्हणजेच युतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रतिस्पर्धी पक्षातून सार्दिन यांनी आता आपला उमेदवार उभा केला आहे असा त्याचा अर्थ होतो. सार्दिन याद्वारे आपले जुने हिशेब पूर्ण करीत आहेत हे जरी खरे असले तरी सध्याच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे स्वपक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याच्या त्यांच्या या कृतीबाबत पक्षश्रेष्ठी आता कारवाई करणार आहेत की सावरून घेणार आहेत हे दिसेलच. मात्र, यातून जनतेत जो काही संदेश गेला आहे तो कॉंग्रेससाठी विलक्षण हानीकारक आहे.