सारस्वत बँकेचे चेअरमन आणि शिवसेनेचे माजी राज्यसभा खासदार एकनाथ ठाकूर यांचे काल कॅन्सरशी दीर्घ लढाईनंतर निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
१९७६ साली आणिबाणीच्या निषेधार्थ त्यांनी स्टेट बँक ऑफीसरपदाचा राजीनामा दिला व युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगची स्थापना केली. आतापर्यंत एनएसबीतर्फे सुमारे ८० हजार तरुणांना नोकर्या मिळाल्या आहेत. २००१साली सारस्वर बँकेचे ते चेअरमन बनले त्यानंतर त्यांनी बँकेला यशोशिखरावर नेले. बँकेचा व्यवसाय ३६ हजार कोटींपर्यंत वाढवला. या काळात बँकेच्या शाखा महाराष्ट्राबाहेर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, गोवा व मध्यप्रदेश येथे विस्तारल्या. सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील म्हापण गावात जन्मलेल्या ठाकूर यांनी इंग्रजीत पदवी मिळवली व त्यानंतर स्टेट बँकेत ते अधिकारी म्हणून कामाला लागले. लहानपणी आई वडलांचे छत्र हरपल्यानंतर मोठ्या बहिणीने त्यांचा सांभाळ केला. बँक कर्मचार्यांच्या लढ्यातही त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. शिवसेनेने त्यांना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवले होते. १९७० साली त्यांना कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र जिद्दीने त्यांनी दीर्घ काळ या दुर्धर आजाराशी लढा दिला.