सायबर गुन्ह्यांतील आर्थिक नुकसान टाळण्यात गोवा देशात 5व्या स्थानी

0
2

सायबर गुन्ह्यांमधील फसवणुकीनंतर भामट्यांनी आपल्या खात्यात वळवलेले पैसे रोखण्यात गोवा राज्य देशात पाचव्या क्रमांकावर आहे. गोव्यातील सायबर प्रकरणे हाताळण्यासाठी समन्वय सुधारण्यासाठी सायबर गुन्हा विभागाने 14 सी दिल्ली येथे एका खास अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (14 सी) च्या डेटानुसार, गेल्या महिन्यात नोंदवलेल्या एकूण आर्थिक फसवणुकीच्या रोखण्यात आलेल्या रकमेच्या टक्केवारीनुसार गोवा आता भारतामध्ये 5 व्या क्रमांकावर आहे. लक्षद्वीप, सिक्कीम, झारखंड या राज्यांसह दमण-दीव, दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश फसवणुकीचे पैसे रोखण्यात गोव्याच्या पुढे आहे.

गोवा पोलिसांनी सायबर गुन्ह्यांचा तपास आणि जागृतीबाबत अनेक धोरणात्मक उपाययोजना हाती घेतल्याने सायबर गुन्ह्यांनंतर भामट्यांनी आपल्या खात्यात पैसे वळवण्याचा केलेला प्रयत्न रोखण्यात यश येत आहे, अशी माहिती सायबर गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

सायबर गुन्हा विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. सुमारे 800 गोवा पोलीस कर्मचाऱ्यांना सायबर गुन्हे रोखण्याबाबत प्रशिक्षित करण्यात आले आहे. प्रादेशिक बँक अधिकाऱ्यांसोबतच्या सहकार्यातून अशा प्रकरणांचा पाठपुरावा केला जात आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.