भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल बीडब्ल्यूएफ क्रमवारीत पुन्हा ‘अव्वल १०’मध्ये परतली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने काल गुरुवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत सायनाने दहावे स्थान प्राप्त केेले आहे. जपानच्या सायाका ताहाकाशी हिची तीन स्थानांनी घसरण झाल्याने नेहवाल, नित्चानोन जिंदापोल व बेवेन झांग यांनी प्रत्येकी एका स्थानाने वर सरकताना अनुक्रमे १०वे, ११वे व १२वे स्थान प्राप्त केले आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू तिसर्या स्थानी कायम आहे. वैष्णवी रेड्डी जक्का ४९व्या, श्रीकृष्णप्रिया कुदरावली ७२व्या व मुग्धा आग्रे ८६व्या स्थानी आहे. आठ स्थानांची अवनती झाल्याने रुत्विका शिवानी गड्डे ८८व्या स्थानी पोहोचली आहे.
पुरुष एकेरीत व्हिएतनाम ओपनच्या उपविजेत्या अजय जयरामला मोठा लाभ झाला आहे. २२ क्रमांकांची उडी घेत त्याने ७१वा क्रमांक प्राप्त केला आहे. याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या मिथुन मंजुनाथ याने २६ स्थानांची उडी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम ८६वे स्थान मिळविले आहे. किदांबी श्रीकांत (८), एचएस प्रणॉय (११), समीर वर्मा (२१) यांच्या स्थानात बदल झालेला नाही. १८ स्थानांचा तोटा झाल्याने लक्ष्य सेन ९६व्या स्थानी पोहोचला आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी २२व्या, राष्ट्रीय विजेते मनू अत्री सुमिथ रेड्डी २८व्या तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी ३०व्या स्थानी जैसे थे आहेत.
मिश्र दुहेरीतही भारताच्या आघाडीच्या तीन जोड्यांच्या स्थानांत कोणताही बदल झालेला नाही. प्रणव जेरी चोप्रा व रेड्डी २४वे, रंकीरेड्डी व पोनप्पा २८वे आणि कुहू गर्ग व रोहन कपूर आपले ३५वे स्थान टिकवून आहेत.