सायना दुसर्‍या फेरीत; सौरभ पराभूत

0
68

भारताची ‘फुलराणी’ तथा स्टार शटलर सायना नेहवालने अमेरिकेच्या बेइवान झँगवर सरळ गेम्समध्ये मात करीत चीन ओपन सुपर सिरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. परंतु पुरुष एकेरीत सौरभ वर्माला पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्याचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.

नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पीव्ही सिंधूला पराभूत करीत जेतेपद प्राप्त केलेल्या सायनाने आपली लय कायम राखताना पहिल्या फेरीत अमेरिकेच्या बेइवान झँगवर मात करायला जास्त घाम गाळावा लागला नाही. तिने ही लढत ३० मिनिटांत २१-१२, २१-१३ अशी जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला.
आता दुसर्‍या फेरीत सायनाची गाठ पाचव्या मानांकित अकाने यामागुची हिच्याशी पडेल. अकानेने पहिल्या फेरीत चीनच्या शियाओशिन चेन हिला २१-१२, २१-१४ असे पराभूत करीत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी सायना आणि अकाने या दोघी चार वेळ समोरासमोर ठाकल्या होत्या. त्यात सायनाला एकदाच विजय मिळविता आलेला आहे. दरम्यान, स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या सौरभ वर्माला फ्रान्सच्या ब्राईस लीवरडेजकडून पराभव स्वीकारावा लागला. ब्राईसने सौरभचे आव्हान १४-२१, २१-१५, ११-२१ असे संपुष्टात आणले.
पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय दुक्कलीलाही पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. त्यांना चेंग ल्यू आणि नान झँग या चीनी जोडीकडून १३-२१, १३-२१ असे पराभूत व्हावे लागले.