सायना उपांत्यपूर्व फेरीत, ज्वाल – अश्‍विन, मनू-सुमिथचे आव्हान संपुष्टात

0
82

भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर सरळ गेम्समसध्ये मात करीत जकार्तात सुरू असलेल्या इंडोनेशियन ओपन सुपरसीरिजच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा आणि मनू अत्री-बी. सुमिथ रेड्डी यांचे आव्हान दुसर्‍या फेरीतच संपुष्टात आले.

जागतिक आठव्या स्थानावरील सायनाने इंडोनेशियाची स्थानिक फित्रियानी फित्रियानचा २१-११, २१-१० असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. या वर्षी झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही सायनाने फित्रियानीवर मात केली होती. सायनाने पहिल्या गेममध्ये सलग ६ गुण मिळवित १४-७ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर खेळावर पूर्ण वर्चस्व मिळवित पहिला सेट २१ -११ असा खिशात टाकला. दुसर्‍या गेममध्ये या हैदराबादी खेळाडूने १०-३ अशी भक्कम आघाडी मिळवित २१-१० अशी सहज बाजी मारली.
तीन वेळच्या विजेत्या सायनाची गाठ आता स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिच्याशी पडेल.
दुहेरीत मात्र भारताच्या ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा आणि मनू अत्री-बी. सुमिथ रेड्डी या महिला व पुरुष दुक्कलींच्या पदरी निराशा पडली. जागतिक १४व्या स्थानावरील ज्वाला-अश्विनी यांना चीनच्या हुआंग याकीआँग व टँग जिनहुआ यांच्याकडून महिला दुहेरीत ९-२१, १८-२१ असा सरळ गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. तर जागतिक २०व्या स्थानावरील मनू-सुमिथ यांना पुरुष दुहेरीत दक्षिण कोरियाच्या को संग ह्युन व शिन बाएक चेओल यांनी १८-२१, १३-२१ असे पराभूत केले.