सायकलवरून पाव विकणार्‍यांना यापुढे एफडीएकडे नोंदणी सक्तीची

0
155

>> सायकलवर बेकरीचे नाव देण्याचीही सक्ती

अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यात सायकलवरून पावांची विक्री करणार्‍यांना यापुढे नोंदणी सक्तीची केली असून सायकलवर बेकरीचे नाव, संपर्क क्रमांक, एफएसएसआयए नोंदणी क्रमांक लिहिण्याचीही सूचना केली आहे.

राज्यात पाव हा अन्नातील एक महत्त्वाचा घटक आहे. सायकलवरून पावांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. या विक्रीमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या एका बैठकीत अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करून नागरिकांना सुरक्षित पाव उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली होती. सायकलवर बेकरीचे नाव, संपर्क क्रमांक लिहिण्याची सूचना त्यात करण्यात आली होती.

राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि पौष्टिक पाव उपलब्ध करण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा, २००६ ची अंमलबजावणी सक्तीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अन्न आणि औषध प्रशासनाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पारंपरिक बेकरी मालकांना नोंदणी दाखला किंवा परवाना सक्तीचा करण्यात आला आहे, तसेच, स्वच्छता आणि आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. बेकरी व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करावेे, अन्यथा, कायद्याचे उल्लंघन करणार्‍यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे. जनतेला अशी प्रकरणए यंत्रणेच्या नजरेस आणण्यास सांगण्यात आले आहे.