सामाजिक सलोख्याचा विद्ध्वंस

0
7
  • अरुण कामत

कोमुनिदाद, सरकारी जमिनीसंदर्भात सरकार नवीन धोरण आखत होते, आणि नेमके अशा वेळीच धर्मरूपी अफूची गोळी परत एकदा देऊन गोमंतकीयांमधील सामाजिक सलोखा नष्ट केला जात आहे.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो; अगदी धर्माभिमानसुद्धा! शांतताप्रिय आणि सुंदर अशी ही आपली गोमंतभूमी. मात्र गेला महिनाभर येथील सामाजिक वातावरण कलुषित होऊन राहिले आहे. शेकडो वर्षे गुण्यागोविंदाने नांदणारे विविध धर्मबांधव आज एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. माणसा-माणसांत आणि अन्य धर्मीयांत एकसंधता साधणे, समाजात सौहार्द निर्माण करणे हेही धर्माचे प्रयोजन आहे. पण दुराभिमानी धर्ममार्तंडांमुळे येथील समाजात एकीऐवजी बेकी निर्माण होत आहे, हे आपले दुर्दैव!
मुळात धर्म-धर्म म्हणजे काय?
‘निसर्गातीत, अत्यंत पवित्र, संपूर्ण मानवी भवितव्याशी संबद्ध, जीवन व विश्व अथवा निसर्ग यांची नियंत्रक अशा अलौकिक शक्तीवर (किंवा अशा शक्तींवर) माणसाची श्रद्धा असते, त्या शक्तीचा (वा शक्तींचा) स्वतःशी अनुकूल, पवित्र व घनिष्ठ संबंध स्थापित करणारी वैयक्तिक अथवा सामाजिक मनःप्रवृत्ती व त्यातून निघणारी आचरणाची पद्धती म्हणजे धर्म (रिलिजन) होय…’ मराठी विश्वकोशात दिलेली ही धर्माची व्याख्या. थोडक्यात सांगायचे तर धर्म ही जीवन जगण्याची पद्धती, असे म्हणता येईल.

आज जगात हजारो धर्म अस्तित्वात असले तरी ख्रिस्ती 31 %, मुस्लिम 25 %, हिंदू 15%, बौद्धधर्मीय 7% हे प्रमुख धर्म मानले जातात. ज्यू, झोरास्ट्रीयन, हिंदू हे सर्वांत प्राचीन धर्म. धर्म निर्माण करण्यामागे मनुष्याचे प्रयोजन काय होते? तर आपल्या आयुष्यात सुख, समाधान, शांती प्राप्त होवो आणि सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमेश्वराशी एकरूप होवो, हेच. प्रत्येक धर्माचे देव, रीती-रिवाज, कर्मकांडे, पूजा वेगवेगळ्या असल्या तरी अंतिम ध्येय मात्र मनुष्याचे जीवन सुखी करणे हेच आहे. या सगळ्यातून मात्र एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो हा की, एवढे प्रचंड संख्येने धर्म अस्तित्वात असूनही आणि पूजाअर्चा, कर्मकांडे पार पाडूनही मनुष्य आज सुखी आणि महत्त्वाचे म्हणजे समाधानी आहे का? धर्मा-धर्मांत, जाती-पोटजातीत शांती आणि सौहार्द आहे का? दुर्दैवाने या दोन्हीं प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असेच येणार.
फार मागे न जाता दुसऱ्या महायुद्धाच्या काही वर्षं आधीचा इतिहास पाहूया. ज्यू हा 4000 वर्षांपूर्वीचा धर्म. हाच ज्यू धर्म इतर धर्मांची जननी बनला, ही या धर्माची खरी थोरवी मानायला हवी. मध्यपूर्वेस प्रथम ख्रिस्ती व नंतर इस्लाम हे धर्म ज्यू धर्मातून उगम पावले. या दोन धर्मांनी ज्यू धर्माकडून काय स्वीकारले, यावरून ज्यू धर्माच्या श्रेष्ठतेची कल्पना येईल. ख्रिस्ती धर्माची सारी पार्श्वभूमी ज्यू इतिहासाची आहे. ‘बायबल’चा ‘जुना करार’ ही जशी ज्यू धर्माने ख्रिस्ती धर्माला दिलेली महान देणगी आहे, तशी दुसरी देणगी म्हणजे येशू ख्रिस्त. येशू व त्याचे समकालीन शिष्य ज्यू होते. ज्यूचा एकेश्वरवाद ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माने स्वीकारला. 1933 साली जर्मनीत सत्तेवर आलेल्या ॲडॉल्फ हिटलरने मात्र ज्यू धर्मीयांचा प्रचंड द्वेष केला. आर्यन वंश सर्वश्रेष्ठ असून ज्यू हे राष्ट्रद्रोही आहेत, असा त्याचा ग्रह होता. स्वतःचे राष्ट्र नसलेले ज्यू लोक इतर राष्ट्रांतील जनतेचे शोषण करतात, अशी हिटलरची धारणा होती. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव होण्यास ज्यू लोकच कारणीभूत आहेत, असा अनेक जर्मनांचा समज झालेला होता. त्यामुळे सर्वसामान्य जर्मन नागरिक ज्यू लोकांचा तिरस्कार करी. हिटलरने सर्वसत्ताधीश बनल्यानंतर ज्यू लोकांना धारेवर धरले. प्रत्येक क्षेत्रातून ज्यू लोकांची पद्धतशीर हकालपट्टी करण्यात आली. पुढील सहा वर्षांत हिटलरने जवळपास साठ लाख ज्यू धर्मीयांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. दुसरे महायुद्ध घडून येण्यास जी मुख्य कारणे होती, त्यात हिटलरही एक होता. मनःशांती आणि मोक्षप्राप्तीसाठी मनुष्याने निर्माण केलेला धर्म द्वेषाचे कारण बनून किती विध्वंस करू शकतो याचे ‘हिटलरचा ज्यू द्वेष’ हे उत्तम उदाहरण आहे.

ऑगस्ट 1947 साली अखंड भारताची फाळणी झाली. हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन नवीन देश, नवीन सीमारेषा आखून जगाच्या नकाशावर प्रकट झाले. धर्म हाच निकष अखंड भारताची फाळणी करताना लावण्यात आला होता. बहुसंख्य मुसलमान असलेला प्रांत म्हणजे पाकिस्तान आणि बहुसंख्य हिंदूंचा प्रदेश तो हिंदुस्थान. पण ही फाळणी हिंदू, मुसलमान आणि शीख धर्मीयांच्या रक्ताचे पाट वाहूनच साध्य झाली. हजारो निरपराध स्त्रिया आणि मुली-पुरुषी अत्याचाराचे बळी ठरले. स्वतःचे शील जपण्यासाठी कित्येक स्त्रियांनी आत्महत्या केली वा त्यांच्याच कुटुंबीयांनी त्यांची हत्या केली. क्रोधाने पेटलेल्या मानवी समूहाने यावेळी अमानुषतेचा कळस गाठला. धर्मप्रेमाने आंधळे झाल्यावर माणुसकीचा पराभव होतो याचे हे दुसरे भयावह उदाहरण होय. फाळणीवेळच्या नृशंस हत्याकांडात अंदाजे दहा लाख माणसे आपला जीव गमावून बसली, तर दीड कोटी लोकांना स्थलांतर करावे लागले.

1980-82 साली स्वतंत्र खलिस्तानी प्रांत मागणीसाठी पंजाब राज्यात हिंसक चळवळ सुरू झाली. मला आठवते, त्याकाळातील संध्याकाळच्या बातमीपत्रात क्रिकेटचा स्कोअर सांगावा इतक्या सहजतेने रोज मृतांचे आकडे सांगितले जायचे. आज पंजाबमध्ये अतिरेकी हल्ल्यात एवढे नागरिक ठार झाले आणि भारतीय सैन्याने वा पंजाब पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात अमुक अतिरेक्यांना कंठस्नान, अशा बातम्या रोज असत. या चळवळीचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जून 1984 साली ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ राबाविले. त्या अंतर्गत शिखांचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या सुवर्णमंदिरात सैन्य घुसवून, मंदिराचा आश्रय घेतलेल्या खलिस्थानी आतंकवाद्यांची हत्या करण्यात आली. आपल्या परम पवित्र धर्मस्थानावर झालेल्या हल्ल्याने शीख धर्मीय प्रचंड क्रोधीत झाले. 31 ऑक्टोबर 1984 रोजी शीख अंगरक्षकांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून केलेली हत्या ही त्या क्रोधाचा परिणाम ठरली. गांधीच्या हत्येनंतर दिल्लीत आणि उत्तर भारतातील काही राज्यांत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत जवळपास तीन हजार शिखांची हत्या करण्यात आली. माणसाचा धर्म हेच शेवटी याही हत्याकांडाचे कारण ठरले.
1818 साली जन्मलेले कार्ल मार्क्स हे प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ, अर्थशास्त्री आणि विचारवंत. अनेक विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास होता. वर्गसंघर्ष आणि धर्म यांवरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. धर्मासंबंधी त्यांचे मत होते की, ‘धर्म दुबळ्या माणसाला भ्रामक, आभासात्मक सुख देतो. त्याची ती गरज आहे, भ्रम आहे. धर्म हा निरुत्साही परिस्थितीतला उत्साह असतो. धर्म लोकांची अफू आहे. खरे सुख न देता, तो अफूसारखी गुंगी देतो.’ आज आपल्या देशातील आणि राज्यांतील परिस्थितीचा विचार करता जवळपास पाऊणे दोनशे वर्षांपूर्वी कार्ल मार्क्सने मांडलेले हे तत्त्वज्ञान आजही खरे ठरते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशात सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारने एकगठ्ठा मतांसाठी कधी अल्पसंख्य तर कधी बहुसंख्य धर्मीयांचे, नाना जात-पंथीयांचे अनुनय करणारे धोरण राबविले. देशाचे एकूणच राजकारण मते मिळवून सत्ता काबीज करण्यापुरते सीमित राहिले. त्यासाठी मग कधी जातीय दंगली भडकावून पोळी भाजण्याचे राजकारण सुरू झाले, तर कधी मंदिर-मशीद-चर्च, पुतळ्यांवरून धार्मिक भावना दुखविण्याचे प्रयत्न होऊ लागले. भारतीय संविधानात ‘सॅक्युलर’ हा शब्द राज्यघटनानिर्मितीपासून समाविष्ट होता की तो नंतर समाविष्ट करण्यात आला इथपासून ते सॅक्युलर म्हणजे सर्वधर्मसमभाव की निधर्मीवाद इथपर्यंत काथ्याकूट होऊ लागले.

संपूर्ण देशासाठी सामाजिक सलोख्याचे अनोखे उदाहरण ठरलेले आपले गोवा राज्य. या राज्यापुढे सद्यस्थितीत अनेक समस्या उभ्या आहेत. बेरोजगारी, प्रत्येक क्षेत्रात परप्रांतीयांचे आक्रमण, बेकायदेशीर खनिज उत्खनन हे प्रमुख प्रश्न तर आहेतच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे येथील निसर्गाची चाललेली अपरिमित अशी हानी. गावोगावी मेगा प्रोजेक्ट्स उभे ठाकत आहेत. हिरवेगार डोंगर केवळ कवितांमध्ये उरले आहेत आणि टेकड्या, माळराने उजाड झाली आहेत. म्हादईच्या खोऱ्यात दरडी कोसळताहेत, तर कर्नाटकच्या अट्टाहासापायी या जीवनदायिनीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. राज्यातील सामाजिक कार्यकर्ते पोटतिडकीने यावर आवाज उठवीत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या या सक्रियतेमुळे सरकारवर दबाव येत होता. कोमुनिदाद, सरकारी जमिनीसंदर्भात सरकार नवीन धोरण आखत होते, आणि नेमके अशा वेळीच धर्मरूपी अफूची गोळी परत एकदा देऊन गोमंतकीयांमधील सामाजिक सलोखा नष्ट केला जात आहे. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवून, समाजात दुफळी माजवून, महत्त्वाच्या विषयांवरून लोकांची दिशाभूल करून अनेक भुते गोव्यात आणण्याचा प्रयत्न होतोय. गोमंतकीयांनो, अफूच्या धुंदीतून बाहेर या. रात्रच नव्हे, दिवसही वैऱ्याचे आहेत…