राज्यातील शांतता आणि एकता कायम राखण्यासाठी चर्च संस्थेकडून सदोदित साहाय्य केले जाणार आहे. सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे, असे आवाहन आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी काल केले.
आल्तिनो, पणजी येथे आर्चबिशप हाऊसने नाताळ व नववर्षानिमित्त आयोजित नागरी रिसेप्शन कार्यक्रमात आर्चबिशप फेर्रांव बोलत होते. सरकारने लोकांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्राधान्यक्रम दिला पाहिजे. राज्यात विविध धर्म, जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. येथील शांतता व सुरक्षित वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. ही शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. तसेच विश्वास आणि सत्याच्या वृद्धीसाठी प्राधान्य देण्याची गरज आहे, असेही फेर्रांव यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, मंत्री, आमदार, राजकीय, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.