राज्यातील काही मोठ्या नाईट क्लबमध्ये सामाजिक अंतराच्या तत्त्वाला हरताळ फासून विकएन्डला मोठ्या गर्दीत जल्लोषात नाईट पार्ट्या आयोजित केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. सरकार अशा क्लब्सवर कारवाई करण्याचा विचार करीत असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली सरकार अशा क्लब्सवर कारवाई करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे.
काही नाईट क्लब्स ज्या पद्धतीने पार्ट्यांचे आयोजन करीत आहे ते धक्कादायक असून या प्रकरणी आपण लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार असून त्याबाबत चर्चा करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
अशा क्लब्सना देण्यात आलेले परवाने रद्द केले जावेत अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली जाणार असल्याचे राणे यांनी नमूद केले. अशा नाईट पार्ट्यांमुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून शेकडो युवकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून आले आहे. या युवकांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करेपर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची दमछाक होऊ लागली असल्याचे राणे म्हणाले.
पर्यटन क्षेत्रात एस्ओपीची कशी अंमलबजावणी करावी याचा सरकार परत एकदा आढावा घेणार असल्याचेही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.