साधा वेळेची गती!

0
335
  •  माधुरी रं. शे. उसगावकर
    (फोंडा)

वेळेचे नियोजन करायचे असेल तर रोज संध्याकाळी किंवा रात्री संपूर्ण दिवसाची डायरी लिहावी. त्यामुळे कामात एकाग्रता निर्माण होते व चांगली सवयही लागते. तणाव कमी होऊन ताजेतवाने वाटते.

वेळेचे चक्र हे सदोदित फिरत राहते. ते कुणालाही थांबत नाही. वेळेची गती साधणे फार महत्त्वाचे, न पेक्षा आळसरूपी भूत मानेवर बसण्यास वेळ लागत नाही. ज्याला वेळेचे महत्त्व कळते तो आपले कार्य वेळापत्रकाप्रमाणे करतो. कारण कधी कधी एक मिनिट उशीर झाला तरी ती व्यक्ती अडचणीत येऊ शकते. उदा. अमुक वाजता ट्रेन पकडायची आणि नेमका प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यास उशीर झाला तर काय उपयोग? सगळी धावपळ, वेळ, पैसा गेलेच ना वाया? त्यासाठी संकल्प करणे आणि वेळीच अंमलात आणणे म्हणजे वेळेबरोबर राहणे. वेळ ही आपल्याला लाभलेली सुसंधी असते. या संधीचा योग्य अवलंब करणे म्हणजेच काळाबरोबर राहणे.

लहानपणी एक गोष्ट वाचली होती. थोडक्यात सांगायचे तर गोपाळ नावाचा एक तरुण होता. वडिलांच्या कमाईवर आराम् करायचा. तो संकल्प करायचा की उद्या सकाळी लवकर उठेल, वडिलांना शेतातील कामात हातभार लावेल. पण कुठलं काय! दुसर्‍या दिवशी उन्हं वर आली तरी झोपलेला असायचा. संकल्पपूर्ती करायची वेळ आली की आज नको, उद्या नक्कीच शेतावर जाईन… असा विचार करून अळम् टळम् करायचा. काही वर्षांनी आईवडलांचं निधन झालं. नातेवाईकांनी शेतजमीन हडप केली. गोपाळचं सगळं होत्याचं नव्हतं झालं. जो वेळेचं नियोजन करतो आणि त्याप्रमाणे कर्तव्य करत असतो त्याच्यावर पश्‍चात्तापाची वेळ येत नाही. वेळ गमावणे म्हणजे आयुष्यातील संधीस मुकणे. वेळ ही नेहमी आपल्या सोबत चालत असते. आपणच वेळेला विसरतो. जन्मापासून मृत्युपर्यंत आपल्याला जो वेळ मिळतो तेच आपले जीवन. म्हणून वेळेचा सदुपयोग करणे हितावह. वेळेचे प्रबंधन म्हणजे टाईम मॅनेजमेंट ही काळाची गरज आहे. आपला वेळ दैनंदिन गोष्टीत कसा, कुठे, केव्हा जातो हे माहीत असणे आवश्यक असते. कधी कधी आपण म्हणतो की मी फार व्यस्त आहे. त्यामुळे माझ्याजवळ वेळ नाही. परंतु हे लक्षात ठेवा की जर आपण आपला वेळ व्यर्थ घालवत असू तर आपले जीवनही व्यर्थ जाईल. त्यामुळे प्रत्येकाने वेळेला महत्त्व देणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण आपले काम वेळेवर करत असू तर आपण वेळेच्या सोबत चालतो. याउलट जर आपल्याकडे आपल्या कामांची लांबलचक यादी असेल तर आपण वेळेच्या मागे आहोत. म्हणजे ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती अनुभवाला येते.

सद्य युगात वेळेचे प्रबंधन हा जीवनातला खरं म्हटलं तर अविभाज्य घटकच होऊन राहिला आहे. त्यासाठी आपल्या जीवनपद्धतीत आवश्यक ते बदल करणे जरुरीचे आहे. वेळेचे नियोजन करायचे असेल तर रोज संध्याकाळी किंवा रात्री संपूर्ण दिवसाची डायरी लिहावी. त्यामुळे कामात एकाग्रता निर्माण होते व चांगली सवयही लागते. तणाव कमी होऊन ताजेतवाने वाटते. आपली उन्नती होते. सुरुवातीला जरा कठीण वाटेल परंतु सरावाने सहज शक्य होतं. माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. जेव्हा प्रत्येक कार्यात आपण वेळेला महत्त्व देतो तेव्हा अनायासे आपला वेळ सत्कारणी लागतो.
वक्तशीरपणामुळे जीवनाला शिस्त लागते. काही चांगले नियम जरूर पाळा. सकाळी लवकर उठणे म्हणजे बहुमूल्य वेळ सार्थकी लागणे. घाई-गडबड न होता कामं सहजपणे मार्गी लागतात. तात्पर्य म्हणजे जो आपल्या वेळेचे मूल्य समजतो तोच आपले जीवन मूल्यवान बनवू शकतो. अशा व्यक्तीला स्वतःच्या वेळेप्रमाणेच दुसर्‍याच्या वेळेचेही महत्त्व जाणवते. वक्तशीर असणारी व्यक्ती दुसर्‍यांची विश्‍वासपात्र बनते.
आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की मानवजीवन हे मर्यादित कालावधीसाठी आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण सफल करणे म्हणजे आपले जीवन सफल करणे. फालतु गोष्टीत आपला वेळ घालवू नका. गेलेली वेळ पुनः कधी येत नाही हे लक्षात ठेवणे जरुरीचे. म्हणूनच म्हटले जाते ‘टाईम अँड टाइड वेट फॉर नन्’.

वर्तमानकाळ हा वेळेचा फार मोठा खजिना आहे. म्हणूनच या खजिन्याला वेळीच महत्त्व देऊन आपल्या जीवनात सद्गुणांची फळे प्राप्त करू. जो वेळेची हाक ऐकत नाही, अर्थात समयाच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करतो, त्याच्या जीवनात दुष्परिणाम ओढवण्याची संभावना असते. जसे सिग्नलप्रमाणे गाडी थांबवावी – चालवावी लागते; नाहीतर याउलट गेल्यास दुर्घटनेला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे समयाचे महत्त्व लक्षात घेऊन कार्यान्वित व्हावे. असा विचार करू नये की अजून खूप वेळ आहे. आपण नंतर कार्यरत राहू. असा निष्काळजीपणा करू नये. तसे केल्यास काहीच हाती लागणार नाही. टाईम वेस्ट केल्यास केवळ पश्‍चात्ताप करण्याची पाळी येईल.
वेळेचे गणित आणि आयुष्याचे गणित यांची योग्य प्रकारे सांगड घातली तर वेळ सत्कारणी लागतो. टाईम मॅनेजमेंट करणे आणि अंगी बाणवणे यातच खरे कौशल्य आहे. ‘ज्याने वेळेला किंमत दिली वेळेने त्याला किंमत दिली’.. हे असेच असते.
वर्तमानात राहून भविष्यकाळाचाच विचार केला तर वेळेेचे योग्य नियोजन कसे होईल? वेळेचे वेळेवर नियोजन करून संकल्पपूर्ती करणे हाच जीवन साफल्याचा मूलमंत्र!!