साधनसुविधा निर्मितीनंतरच नव्या वाहन कायद्याची अंमलबजावणी करावी ः दिगंबर

0
134

राज्यात आवश्यक साधन सुविधा तयार केल्यानंतर नवीन मोटर वाहन दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत करण्यात आली आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

नवीन मोटर वाहन दुरुस्ती २०१९ कायद्यात वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ केलेली आहे. त्याच बरोबर रस्त्यावरील आवश्यक साधन सुविधा निर्माणावर भर देण्यात आलेला आहे. खराब रस्त्यांना अधिकार्‍यांना जबाबदार धरण्याची तरतूद आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रथम रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. तसेच आवश्यक ठिकाणी वाहन गतीविषयक फलक उभारण्याची गरज आहे, असेही कामत यांनी सांगितले.

कॉंग्रेसच्या विधीमंडळ बैठकीत चांद्रयान-२ मोहिमेत सहभागी झालेले इस्त्रोचे प्रमुख के. शिवन व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात १८ सप्टेंबर २००८ मध्ये चांद्रयान -२ मिशन हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही कामत यांनी सांगितले.

खाणप्रश्‍नी वेट अँड वॉच
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पावसाळी अधिवेशनात खाण प्रश्‍नी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने खाण प्रश्‍नी तूर्त वेट ऍण्ड वॉच अशी भूमिका घेतलेली आहे, असे विरोधी पक्षनेते कामत यांनी सांगितले. खाण प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही समिती खाण प्रश्‍न कोणता तोडगा काढते याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही कामत यांनी सांगितले.