साथ हवीच!

0
120

भारतीय जनता पक्षाचे सरकार काल महाराष्ट्रात एका भव्य दिव्य सोहळ्यात सत्तारूढ झाले. शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहणार असलेले उद्धव ठाकरे अखेरच्या क्षणी, ज्यांच्यावर आधी शेलकी टीका केली होती, त्या भाजपाध्यक्ष अमित शहांच्या एका फोनवर सोहळ्याला हजर झाले. शिवसेनेने स्वतःचा जो असंतोष प्रकट करून दिला होता, त्याला तात्त्विक अधिष्ठान आहे असे दिसत नव्हते. आपल्या सौदेबाजीला भाजप भीक घालत नाही यामुळेच हा सारा तमाशा चालला होता की काय असे चित्र त्यामुळे निर्माण झालेले आहे. एकीकडे ‘सामना’ मधून बिगरकॉंग्रेसी सरकार सत्तेवर येते आहे म्हणून हर्ष व्यक्त करायचा आणि दुसरीकडे त्या सरकारच्या वाटेत काटे पेरायचे हा जो दुतोंडीपणा चालला होता, त्यातून शिवसेनेची प्रतिमा कलंकित होते आहे याचे भान उद्धव ठाकरे आणि त्यांच्या इतर नेत्यांना असायला हवे होते. शिवसेनेला खरोखरच विरोधात बसायचे असेल तर त्यांनी सरळ तशी घोषणा करून टाकणे योग्य ठरले असते. पण सेनेला सत्तेत यायचे आहे आणि त्यासाठी सौदेबाजीही करायची आहे. त्यामुळे उपस्थित राहणार नसल्याच्या गर्जना करूनही शेवटी हजेरी लावली गेली. सशर्त पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आडून आडून द्यायचा प्रकार गेले काही दिवस चालला आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले. पक्षाध्यक्ष अमित शहांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांवर अत्यंत खालच्या पातळीवरून टीका केली गेली. काही जागा कमी आल्या असल्या तरीही ज्या प्रकारे भाजपने सेनेची उपेक्षा चालवली आहे ती पाहिली, तर झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणून शिवसेनेला दार उघडून ‘या, बसा’ म्हणण्याची भाजपा नेत्यांची इच्छा दिसत नव्हती. राष्ट्रवादी संदर्भात जशी एका नेत्याने टिप्पणी केली होती की, ‘‘लग्नाला येऊ नको म्हटले तरी कोणत्या गाडीत बसू?’’ त्याप्रमाणे आज सेनेची गत झालेली दिसते आहे. निवडणुकीचे निकाल आले तेव्हा भाजपवर दबाव वाढवण्यासाठी शिवसेनेने अखंड महाराष्ट्राचा मुद्दा पुढे केला होता. पण भाजपने त्याला न जुमानता देवेंद्र फडणविसांसारख्या स्वतंत्र विदर्भाच्या कट्टर पुरस्कर्त्यालाच मुख्यमंत्रिपद दिले आणि सेनेचा दबाव झुगारण्याची आपली नीती जाहीर केली. तरीही सेनेची एकंदर भूमिका संभ्रमितपणाची राहिली आहे. सत्तेत सामील व्हायचे असेल तर शपथविधीवरील बहिष्काराचे नाटक कशासाठी चालले होते? शपथविधीच्या पहिल्याच फेरीत सेनेच्या मंत्र्यांनाही शपथ द्या असा प्रस्ताव सेनेने दिलेला होता, जो धुडकावला गेला आहे. त्यामुळे आपला ‘सन्मान’ राखण्यासाठी उद्धव शपथविधीस गैरहजर राहात असल्याचे शिवसेनेचे काही नेते सांगत होतेे, पण आपला सन्मान न होण्याची तरतूद सेनेने आजवरच्या आपल्या एकंदर वागण्यानेच करून ठेवलेली होती. मोदींचा बाप काढणार्‍यांना भाजपाने आवतण देऊन मानसन्मान करावा अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे कमालच म्हणायला हवी. भाजपलाही सेनेची साथ हवी. त्यामुळे राज्याचे हित विचारात घेऊन सेनेने आपली आडमुठी व संभ्रमित करणारी भूमिका बदलण्याबाबत विचार करायला हवा. सध्या जनतेमध्ये निष्कारण पक्षाची प्रतिमा मलीन होत चालली आहे. महाराष्ट्राला एक बिगरकॉंग्रेसी स्थिर व कार्यक्षम सरकार देण्याची जबाबदारी जशी भाजपची आहे, तशीच ती त्याच्याशी वैचारिक धागे जुळणार्‍या शिवसेनेचीही आहे. या आपल्या कर्तव्यात स्वार्थासाठी कसूर करणे म्हणजे जनतेशी केलेली प्रतारणा ठरेल. सत्ता वाटपासंदर्भात काही मतभेद असू शकतात, परंतु समंजसपणे ते सोडवणे काही कठीण नसावे. या ‘देवेंद्रा’चे आसनही डळमळीत ठेवण्याचे काही कारण नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या एका उमद्या, तरूण, अभ्यासू व्यक्तीकडे या सरकारची धुरा आली आहे. भाजपाचे हे सरकार सध्या अल्पमतात असले, तरीही त्या पक्षाचे ते स्वबळावर आलेले सरकार असल्याने निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकारवर आली आहे. ‘अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा सवाल निवडणुकीत मागील सरकारला करणारा भाजप आता महाराष्ट्र कुठे नेणार आहे याची जनतेला प्रतीक्षा आहे. राज्याच्या विकासाच्या वाटा खुल्या करण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे आणि ते पेलण्यासाठी सेनेची साथही!