सात मिनिटांत झालो भारताचा प्रशिक्षक

0
106

>> माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी जागवल्या आठवणी

‘मला खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा काडीमात्र अनुभव नव्हता. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मला प्रशिक्षक म्हणून कारकीर्द घडवायची होती. गावसकर यांच्या पुढाकारामुळे केवळ सात मिनिटांत माझी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी निवड झाली’, असे टीम इंडियाला विश्‍वविजेतेपद मिळवून दिलेले प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी काल सोमवारी सांगितले.

गॅरी कर्स्टन म्हणाले की, २००७ मध्ये फक्त सात मिनिटांत मला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद मिळले. हे पद मिळण्यासाठी लिट्ल मास्टर सुनील गावसकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.‘क्रिकेट कलेक्टिव’ या पॉडकास्ट दरम्यान त्यांनी हा खुलासा केला आहे. कर्स्टन म्हणाले, की त्यावेळी प्रशिक्षक निवड पथकाचा भाग असलेल्या सुनील गावसकर यांचा मला एक ई-मेल आला. ज्यामध्ये त्यांनी मला भारतीय संघाच्या प्रशिक्षक होण्याची इच्छा आहे का, असे विचारले होते.

मला वाटले ते मस्करी करत आहेत, म्हणून मी त्यांना नाही म्हणून कळवले. त्यानंतर त्यांचा आणखी ई-मेल आला. ज्यामध्ये त्यांनी मला मुलाखतीला येण्याची विनंती केली. मी हा ई मेल बायकोला दाखवताच त्यांना तुम्हीच हवे असाल असे तिने मला सांगितले आणि मी होकार कळवला.

ते पुढे म्हणाले की, मी जेव्हा मुलाखतीसाठी भारतात पोहोचलो तेव्हा तत्कालीन भारतीय कर्णधार अनिल कुंबळे माझ्या निवडीबद्दल साशंक होता. कुंबळे याने मला विचारले की तुम्ही येथे काय करत आहात. मी प्रशिक्षकपदाच्या मुलाखत देण्यासाठी आलोय असे सांगताच तो खळखळून हसला होता.

मााझ्या मुलाखतीत मंडळाच्या सचिवांनी मला विचारले की भारतीय संघाला पुढे नेण्यासाठी तुम्ही काय करू शकता?, मी त्यांना सांगितले की, ‘सध्यातरी माझ्या डोक्यात काही नाही. मला कोणीच तयारी करायला सांगितले नाही. मी नुकताच भारतात दाखल झालो आहे.’

यानंतर रवी शास्त्री यांनी मला विचारले की, तुम्ही दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारताला नमविण्यासाठी काय करता. मी त्यांना मूळ व्यूहरचना न सांगता दोन-तीन मिनिटांत काही माहिती सांगितली. या माहितीमुळे सर्व प्रभावित झाले व तीन मिनिटांत माझ्या हातात करारपत्र सोपवण्यात आले. या करारपत्रावर मावळते प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचे नाव होते. मी याची जाणीव करून देताच त्यांनी चॅपेल यांचे नाव खोडून माझे नाव लिहिले आणि माझी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली, असे गॅरी कर्स्टन यांनी सांगितले.