वाहतूक खात्याकडे मागील एप्रिल ते ऑक्टोंबर या सात महिन्यात ४९,२४० वाहनांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण वाहनाचा आकडा आता १२ लाख ८७ हजार ८८४ वर पोहोचला आहे.
राज्यात वाहनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील लोकसंख्या पंधरा लाखाच्या आसपास आहे. तर या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यत राज्यातील वाहनांची संख्या सध्याची वाहन नोंदणीची गती पाहता तेरा लाखांवर पोहणार आहे.
मागील सात महिन्यात झालेल्या वाहन नोंदणीचा आढावा घेतल्यास राज्यात दर दिवसाला साधारण २३० नवीन वाहनांची नोंदणी होते, असे दिसून येत आहे. मागील २१४ दिवसात ४९, २४० वाहनांची नोंद झाली आहे. राज्यात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील वाहनाबरोबर परराज्यातील शेकडो वाहने राज्यात वाहतूक करतात. राज्यात रस्ते वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे अपुरे पडू लागले आहेत. तसेच वाहन अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
वाहतूक खात्याने सात महिन्यात १८५ कोटी रूपयांचा महसूल गोळा केला आहे. सरकारी तिजोरीत वाहतूक खात्याकडून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा जमा केला जातो. वाहतूक खात्याने काही महिन्यापूर्वी वाहन नोंदणी शुल्कात वाढ केलेली आहे. आता फॅन्सी क्रमांक शुल्कात मोठी वाढ केली आहे. या शुल्कवाढीचा सामान्य वाहन खरेदी करणार्यावर कोणताही परिणाम होणार नाही. वाहनाला फॅन्सी क्रमांक घेऊ इच्छिणाला पदरमोड करावी लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.