सात दिवसांत राज्यात १५२० रुग्णांची नोंद

0
22

>> नाताळ ते नववर्ष कालावधीत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

नाताळ ते नववर्ष या कालावधीत मोठ्या संख्येने राज्यात दाखल झालेले पर्यटक आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या संगीत रजनी व अन्य सोहळ्यांमुळे राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे गेल्या काही दिवसांतील आकडेवारीतून दिसून आले आहे. गेल्या सात दिवसांत राज्यात नवे तब्बल १५२० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच सात दिवसांपूर्वी ५००च्या खाली असलेली सक्रिय रुग्ण संख्या आता १६७१ वर पोहोचली आहे.

राज्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित सापडत असल्याने ही तर तिसर्‍या लाटेची चाहूल तर नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. नाताळ सणानंतर राज्यात रुग्णसंख्या वाढू लागल्याने राज्य सरकारने कोविड तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनंतर काही निर्बंध लागू केले; मात्र या निर्बंधांची कडक अंमलबजावणी न झाल्याने त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढीत झाला आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये प्रवेशासाठी राज्य सरकारने लसीकरण प्रमाणपत्र किंवा कोविड चाचणी प्रमाणपत्राची सक्ती केली होती. तसेच अन्य काही निर्बंध देखील लादले होते; मात्र या नियमांची अंमलबजावणी होते की नाही, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

नववर्ष स्वागतासाठी राज्यातील बहुतांश किनार्‍यांवर पर्यटकांसह स्थानिकांनी गर्दी केली होती. यावेळी सामाजिक अंतर, मास्क यासारख्या नियमांचे कोठेच पालन होत नसल्याचे दिसून आले. दरम्यान, कालपासून किनारपट्टी भागातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, तेथील एका रस्त्यावर पर्यटक व लोकांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येवर नजर टाकल्यास नाताळ सण झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे २८ डिसेंबरला ११२ रुग्ण आढळून आले, तर २९ डिसेंबरला १७० रुग्ण सापडले. त्यानंतरच्या पुढील दोन दिवसांत २०० हून अधिक, तर गेल्या दोन दिवसांत ३०० हून अधिक रुग्ण सापडले. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यात दरदिवशी ५०० च्या घरात कोरोना रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

>> नवे ३८८ रुग्ण; सक्रिय रुग्णांचा आकडा दीड हजारांच्या वर

गोव्याचा प्रवास आता कोविडच्या तिसर्‍या लाटेच्या दिशेने सुरू झालेला असून, काल राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले ३८८ नवे रुग्ण सापडले. परिणामी राज्यातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या आता १६७१ वर पोहोचली आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत ३६०४ जणांची कोरोनासाठी चाचणी करण्यात आली, त्यापैकी ३८८ नमुने कोविडबाधित आढळून आले. त्यातील ३८४ रुग्णांनी गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे, तर ४ जणांना इस्पितळात दाखल केले आहे. काल राज्यात कोविडमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, मृतांचा एकूण आकडा हा ३५२३ एवढा झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१४ टक्के असून, गेल्या २४ तासांत ५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसर्‍या बाजूला राज्यातील कोरोना संक्रमण दर हा आता वाढून तब्बल १०.७७ टक्के एवढा झाला आहे. त्यामुळे राज्य आरोग्य खाते, सरकार व जनता यांच्यासाठी ती चिंतेची बाब ठरली आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण
मडगाव आणि पणजी शहरात

सध्याच्या घडीला सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे मडगाव आणि पणजीत या ठिकाणी आहेत. मडगावात २११, तर पणजीत २०१ सक्रिय कोविडबाधित आहेत. कासावलीत १४४, कुठ्ठाळीत १११, पर्वरीत ९५, म्हापशात ८७, चिंबलमध्ये ७१ शिवोलीत ६४, कांदोळीत ६२ असे सक्रिय रुग्ण आहेत.